महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुडतुडा किडीमुळे शेतकरी हतबल, हातातोंडाशी आलेले धान नष्ट होण्याच्या मार्गावर - भंडारा जिल्हा भातावर कीड

कष्टाने पिकविलेले आणि हातातोंडाशी आलेले धानाचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पिकावरील तुडतुडा किडीमुळे संपूर्ण पीक सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

धान नष्ट होण्याच्या मार्गावर
धान नष्ट होण्याच्या मार्गावर

By

Published : Nov 5, 2020, 12:43 PM IST

भंडारा - संकटाचा सामना करीत कष्टाने पिकविलेले आणि हातातोंडाशी आलेले धानाचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पिकावरील तुडतुडा किडीमुळे संपूर्ण पीक सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र यावर्षी शासनाने पहिल्यांदाच किडीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्याचे ठरविले आहे.

हातातोंडाशी आलेले धान नष्ट होण्याच्या मार्गावर

किडींचा प्रादुर्भाव वाढला...

शेतातील धान पीक सध्या 140 ते 150 दिवसाचे आहे. पुढच्या 10 ते 20 दिवसात हे धान कापणीला येणार आहे. मात्र मागच्या 15 ते 20 दिवसांपासून तुडतुडा किडीमुळे धानावर अचानक संकट ओढवले आहे. मागील आठ ते दहा दिवसात किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. सध्या जिल्ह्यात सर्वच तालुक्यात तुडतुड्याने पाय पसरविले आहेत. त्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होत आहे. या किडी अगदी मुळापासून पिकांचे रस शोषून घेतात. त्यामुळे पिकांचे तनससुद्धा जनावरांच्या कामात येत नाही. शेतकरी बरीच औषधे देत आहे. मात्र कीड नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहेत. कमीत कमी तनस कामात यावे आणि पुढे गव्हाचे पीक घेण्यासाठी शेत कामात यावे यासाठी काही शेतकरी अपूर्ण असलेले धानाचे पीक कापून घेत आहेत. मात्र कापलेले तनस जनावरांना खाण्याच्या कामात येईल का, या विषयी स्वतः शेतकरी आश्वस्त नाहीत.

शेतकरी सापडले आर्थिक अडचणीत...

शेतकऱ्यांना मशागतीपासून तर रोवणी, मजूरी, खते, औषधे यावर जवळपास एकरी 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. तुडतुड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे धान होणार नसल्याने शेतकऱ्यांना फायदा तर होणार नाहीत, उलट त्यांनी लावलेला पैसा सुद्धा वसूल होणार नाही. त्यामुळे बँकेतून घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पहिल्यांदाच किडीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळणार..

या अगोदरही बऱ्याचवेळा तुडतुड्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र शासनाने नुकसान भरपाई दिली नाही. मात्र या वर्षी पहिल्यांदाच शासनाने तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानीला आपत्कालीन नुकसानीत समाविष्ठ केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे ठरविले असून लवकरच सर्वे करून शासनाला त्याची माहिती पाठविणार असल्याचे, उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्याना नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details