भंडारा -आता भंडारा शहरातील कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी वनवन करावी लागत नाही, कारण ज्या रुग्णाला ऑक्सिजनची नितांत गरज आहे, अशा रुग्णाना आता भंडारा शहरातील 6 मित्रांनी तयार केलेला 'ऑक्सिजन मदत ग्रुप' द्वारे निशुल्क ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले जात आहे. भंडारा शहरातील ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या मालकाच्या अभिनव संकल्पनेतून हे शक्य झाले आहे.
हेही वाचा -भंडारा : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राबविला चार सूत्री कार्यक्रम
6 मित्रांनी एकत्रित येत सुरू केला मदत ग्रुप
कोरोना काळात बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडते, मात्र ऑक्सिजन बेड रुग्णालयात उपलब्ध नसतात तेव्हा या रुग्णांना घरीच उपचार घ्यावा लागतो. मात्र, ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था न झाल्यास रुग्णांचा जीव जातो. यावर उपाय म्हणजे 'ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर', मात्र ही मशीन प्रत्येकांना आर्थिक दृष्ट्या घेणे शक्य होत नाही किंवा बऱ्याच लोकांना इच्छा असूनही विकत मिळत नाही. म्हणून भंडारा शहरातील 6 तरुणांनी एकत्रित येत ऑक्सिजन मदत ग्रुपची स्थापना केली.
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सहायाने घरपोच मदत
'ऑक्सिजन मदत ग्रुप' च्या माध्यमातून भंडारा शहरातील कोरोना रुग्ण ज्यांची ऑक्सिजन लेवल 94 ते 84 पर्यंत आहे अशा रुग्णाला ऑक्सिजनची गरज असल्याने त्यांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले जाते. भंडारा शहरातील ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअरचे मालक रोशन काटेखाये यांच्या संकल्पनेतून हा ग्रुप तयार झाला आहे. या ग्रुपमधील इतर पांच मित्र संजय चौधरी, मनीष वंजारी, यश ठाकरे, शालिक अहिरकर, काटेखाये यांनी एका व्यक्तीकडून उपयोगात नसलेले 10 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर घेतले. त्याचबरोबर, 'ऑक्सिजन मदत ग्रुप' असा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करत गरजूंना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले.