भंडारा- राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णंसख्येने ८ लाखांचा टप्पा ओलांडला असला तरी प्रशासनाकडून एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात आजही कोरोनाशी एप्रिल महिन्यातील नियोजनाप्रमाणे संघर्ष केला जात आहे. हे समोर आणणारी घटना रविवारी घडली. भंडारा जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्युदर वाढले आहेत. मात्र, आजही जिल्ह्यात दोन पेक्षा जास्त रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यास त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे शक्य होत नाही. प्रशासनाने देखील याबाबत व्यवस्था केली नसल्याचे दिसून येते.
भंडाऱ्यात कोरोनाबाधितांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच प्रश्न एका दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्यास तिसऱ्या मृत व्यक्तीच्या कुटुंबांला अंत्यसंस्कारासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते. यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाच्या संतापाला आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. रविवारी चार मृतदेहांना अग्नी देण्याची वेळ आल्यावर दोन मृतदेहाना चक्क मोकळ्या जागेत अग्नी द्यावी लागली. निसर्गाने साथ दिल्याने हे मृतदेह जाळण्यासाठी कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. मात्र प्रशासन निर्णय कोरोनावबाबतच्या उपाययोजना राबवण्यात किती जागरुक आहे,याची प्रचिती नागरिकांना येत आहे.
मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर योजना आखल्या गेल्या. याचाच एक भाग म्हणून कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णांवर अंत्यविधी करण्यासाठी भंडारा शहराच्या बाहेर एका पुनर्वसन होत असलेल्या गावाच्या स्मशानभूमीत व्यवस्था करण्यात आली. मात्र, येथे एका वेळी केवळ दोन व्यक्तींवर अंत्यसंस्कार करता येतात. मे महिन्यापर्यंत भंडारा जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता.जुलै महिन्यापर्यंत कोरोनामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला. ऑगस्टमध्ये हा आकडा वाढून वीस पर्यंत गेला आणि 6 सप्टेंबरला भंडारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची मृत्यूसंख्या 37 झाली आहे. म्हणजे मागच्या दोन महिन्यापासून कोरोनामुळे होणारा मृत्यूदर वाढलेला आहे.
हेही वाचा-पूर नेमका कोणाच्या चुकीमुळे? राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा पूर
जिल्ह्यात कधी एक कधी दोन तर कधी तीन रुग्ण एका दिवशी कोरोनामुळे दगावले. ज्या दिवशी दोन पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुळे दगावले त्यादिवशी तिसऱ्या किंवा चौथ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मृतदेहाची अंत्यविधी करण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागत आहे. कारण अग्नी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शेडमध्ये एका दिवशी केवळ दोन मृतदेहांना अग्नी देता येतो. मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी याविषयी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. मात्र, अजूनही नवीन शेड तयार केले गेले नाही.
शनिवारी भंडारा जिल्हा तीन रुग्ण कोरोनामुळे दगावले होते. या पैकी दोन रुग्णांना अग्नी देण्यात आला.तिसऱ्या मुतदेहाला अव्यवस्थेमुळे शवगृहात रात्रभर ठेवावे लागले. रविवारी अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच पुन्हा तीन रुग्ण कोरोनामुळे दगावले. या तिन्ही रुग्णाच्या कुटुंबांनी आमच्या रुग्णाचा अंत्यविधी रविवारीच व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. वाढता दबाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी या चारही रुग्णांची अंत्यविधी करण्याचे आदेश दिले. मात्र, एका वेळी दोन पेक्षा जास्त रुग्णांना अग्नी देता येत नसल्याने उर्वरित दोन मृतदेहांना शेडच्या बाहेर उघड्यावर जाळण्यात आले. पावसाळा सुरू असल्याने पाऊस कधीही येऊ शकतो, मृतदेह जळल्यानंतर जर पाऊस आला असता तर उघड्यावर जाळण्यात आलेले मृतदेह अर्धवट जळाले असते. मात्र, निसर्गाने साथ दिली असली तरी भविष्यातही हीच परिस्थिती कायम राहिल, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरणार आहे. यापेक्षा प्रशासनाने जर वेळीच खबरदारी घेतली असती आणि कोरोनामुळे वाढत असलेल्या मृत्यूंची संख्या लक्षात घेऊन अजून शेड तयार केले असते तर दोन मृतदेहांना उघड्यावर जाळण्याची वेळ आली नसती.
कोरोनाबाधित मृतदेहांवर अत्यविधीची ज्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठीचे रस्तेही अतिशय वाईट आहेत. सायंकाळी मृतदेह जाण्याची वेळ आल्यास तिथे विजेची व्यवस्था नव्हती त्याची सध्या सोय करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दररोज हे मृतदेह जाळण्याची जबाबदारी आहे त्यांची केवळ एकच टीम आहे. सरणासाठी लागणारे सर्व साहित्य आणण्यापासून तर सरण रचण्याचे काम हे कर्मचारी करतात. बऱ्याच वेळा मृतदेहाला अग्नि देण्याचे काम सुद्धा त्यांनाच करावे लागते. यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुढच्या काही दिवसात हे सर्वच लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले तर मृतदेह जाळण्याची संपूर्ण प्रक्रिया अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन टीम तयार केल्यास नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास नक्कीच कमी होईल. या विषयी मुख्याधिकारी यांना विचारले असता त्यांनीही या अडचणी असल्याचे मान्य केले. या विषयी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली असून लवकरच या सर्व अडचणी दूर करू असे सांगितले.