महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद..! पूरग्रस्तांसाठी १३ दिवसांचा गणपती ठेवला केवळ दीड दिवस - ganeshpur

गणेशोत्सवात येणाऱ्या जास्तीच्या खर्चाला फाटा देत भंडाऱ्याच्या गणेशपूर येथील सन्मित्र गणेश मंडळाने १३ दिवसाचा गणपती केवळ दीड दिवस बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बाकीचा खर्च हा पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

सन्मित्र गणेश मंडळाची गणेश मूर्ती

By

Published : Sep 3, 2019, 12:49 PM IST

भंडारा - पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागात महापूर आला होता. सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. येथील महापूर ओसरला असताना आता मानवतेचा महापूर आला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकवटा आहे. यंदाच्या गणेशोत्सवात येणाऱ्या जास्तीच्या खर्चाला फाटा देत भंडाऱ्याच्या गणेशपूर येथील सन्मित्र गणेश मंडळाने १३ दिवसाचा गणपती केवळ दीड दिवस बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बाकीचा खर्च हा पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या भक्ती-भावाने, वाजत-गाजत साजरा केला जातो. गणेशोत्सवात मोठमोठ्ठे डीजे लावणे, विविध देखावे सादर करणे, विद्यूत रोषणाईने मंडप व परिसर सजविणे, मिरवणुका काढणे यासाठी मोठा खर्च करण्यात येतो. परंतु यंदा या मंडळाकडून हे सर्व टाळून अंत्यंत पारंपारिक पद्धतीने डफली आणि शहनाईसोबत दीड दिवसांत विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वर्गणी गोळा करण्यात येणार आहे.


गेल्या ४० वर्षांपासून गणेशपूर येथे बाप्पांची स्थापना करण्यात येते. मागील वर्षी १३ दिवस गणपतीची स्थापना करण्यात आली होती. मोठा शामियाना(मंडप), अर्धा किलोमीटर लांब विद्युत रोषणाई आणि २० ते २५ फुटांची मूर्ती, असा सर्व लवाजमा राहायचा. गणेशपूरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या बाप्पाला पाहण्यासाठी हजारो भाविक दररोज गर्दी करत होते. मात्र, यावर्षी दीड दिवसांतच बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार असल्याने भाविकांना दर्शन करता येणार नाही.

सोमवारी सकाळी बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. छोट्याशा मंडपात एक छोटेखानी मूर्ती बसवून ही स्थापना झाली. मागील वर्षी बाप्पा १३ दिवस विराजमान होते. त्यावेळी जवळपास १२ लाख रुपये खर्च झाले होते. यावर्षी केवळ दीड दिवसाच्या या गणपतीवर १ केवळ एक लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. जेवढी रक्कम शिल्लक राहील तेवढी आणि मिरवणुकीच्या दरम्यान वर्गणीतून जमा होणारी रक्कम एकत्रित सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तच्या मदतीसाठी पाठविली जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे यांनी सांगितले, या मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप, स्वच्छता अभियान घेतले जातात. मात्र, या वर्षी पूरग्रस्त लोकांसाठी घेतलेला निर्णय सर्वांचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details