भंडारा- लॉकडाऊन आणि निसर्गाच्या कृपादृष्टीने यावर्षी भंडारा जिल्ह्यातील लोकांना पाणी संकटाचा सामना करावा लागला नाही. मात्र, मागील आठ दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाल्याने पाणी पातळी खाली गेली आणि काही लोकांच्या बोअरवेल आटल्याने पाणी टंचाई भासू लागली आहे. मात्र, ही टंचाई मागच्या वर्षीच्या तुलनेत केवळ 20 टक्के आहे. अजूनही भंडारा शहरात केवळ 2 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर, ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदने लॉकडाऊनमध्येही कामे सुरूच ठेवले होते.
लॉकडाऊन व निसर्गाच्या मदतीमुळे यावर्षी भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नाही यावर्षी भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नाही. असे असले तरी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद भंडारा तर्फे पाणीटंचाईसाठी नियोजन केले गेले असून लॉकडाऊनच्या काळातही पाणीटंचाईचे काम सतत सुरू राहिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत 877 गावांसाठी 1 हजार 163 उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये 639 बोरवेल, 177 विहीर खोलीकरण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती 107, विंधन विहिरींची दुरुस्ती 263 आणि विहीर अधिग्रहण 4 या योजनांचा समायोजन आहे. यापैकी आत्तापर्यंत 665 गावांमध्ये 879 योजना मंजूर होऊन 196 गावातील 316 कामे पूर्ण झाली आहेत. बाकी सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांनी सांगितले.
मागच्या वर्षी भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे बांधकाम बंद असल्याने पाण्याच्या उपसा झाला नाही. तसेच मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आलेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहिली. परिणामतः मागच्या वर्षीच्या तुलनेत केवळ 20 टक्के लोकांना पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. मागच्या वर्षी एका प्रभागातील सहाशे लोकांना दररोज दोन टॅंकरद्वारे बारा ट्रिप मारत 60 हजार लिटर पाणी वाटले जात होते. हे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होऊन जूनच्या अखेरपर्यंत सुरू राहायचे. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यात टँकरने पाणी वाटले नाही.
मागच्या आठवड्यापासून वाढलेल्या तापमानामुळे पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच नळाला येणारे पाणीसुद्धा कमी येत असल्याने दीडशे ते दोनशे घरातील लोकांना पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. असे या प्रभागातील नगरसेवकाने सांगितले. मागच्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची मागणी जरी कमी असली तरी शहरातील गरजू लोकांना पाण्याची गरज आहे. सध्या नगरपालिकेच्या केवळ दोन टॅंकरद्वारे हा अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. आजघडीला निर्माण झालेल्या पाण्याच्या गरजेनुसार अजून टँकरची गरज आहे. मात्र, असे असले तरी भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अधिकच्या टँकरची परवानगी देत नसल्याने गरजू लोकांपर्यंत त्यांच्या आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करणे कठीण जात असल्याचे एका नगरसेविकांच्या पतीने सांगितले आहे.