भंडारा - महाराष्ट्रातील काही भागात पावसाने कहरच केला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील धरणं कोरडे पडले असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ 78 टक्के पाऊस झाला आहे. तर, केवळ पवनी तालुक्यात ही सरासरी 113 टक्के असून उर्वरित तालुक्यांमध्ये 55 ते 75 टक्केच सरी बरसल्या आहेत. तर, तुमसर तालुक्यातील बावनथडी सारख्या मोठ्या प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा असल्याने भविष्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
भंडारा जिल्ह्यात पाणीटंचाई; पाणी प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा, भात रोवणीही 30 टक्केच - bhandara rain news
भंडारा जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट पसरले असून, सरासरीच्या ७८% पाऊस पडला आहे. तर, तुमसर तालुक्यातील बावनथडी सारख्या मोठ्या प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा असल्याने भविष्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
तुमसर तालुक्यातील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे बावनथडी धरण, या धरणाच्या पाण्यावर हजारो हेक्टरवरील शेती अवलंबून आहे. रोवणी, किंवा धान्याच्या शेवटी रोपे जगविण्यासाठी पाण्याची गरज असो, या सर्वाला धरणाचे पाणी महत्वाचे ठरते. मात्र, यावर्षी तुमसर तालुक्यात सरासरी 72 टक्केच पाऊस आला, असल्याने धरणात आज घडीला उपयुक्त जलसाठा शून्य आहे. तर, चांदपूरच्या मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा 10.308, एवढा असून उर्वरित बघेडा, बोथली, सोरणा या मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठाच नाही. हिच परिस्थिती जिल्ह्यातील 31 ही लघु प्रकल्पाची आणि जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्वच तलावांची आहे.
ऑगष्ट महिना सुरु असला तरी जिल्ह्यात सरासरीच्या ७८% पाऊस पडला आहे, पिण्याचे पाणी राखीव ठेवले असल्याने शेतीकरिता पाणीसाठाच उरलेला नाही. भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३० टक्केच रोवण्या झाल्या आहेत त्यामुळे, शेतकऱ्यांकरिता ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. जर, आता सरासरीनुसार पाऊस आला नाही तर शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान होईल आणि उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्येला जिह्यातील नागरिकांना समोर जावे लागेल असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.