महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; समान काम समान वेतनाची मागणी

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाना या सर्व ठिकाणी एएनएम, जीएनएम, फार्मासीस्ट, लॅब टेक्निशियन, ड्रेसर अशा विविध पदावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2007 पासून कामावर घेणे सुरू केले आहे. दरवर्षी या कर्मचाऱ्यांना 11 महिन्याचा कंत्राट दिला जातो. 2007 मध्ये कामावर लागलेल्या लोकांना 5000 वेतन होते.

By

Published : Jun 13, 2020, 9:20 PM IST

Bhandara
आंदोलक

भंडारा- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत 600 कर्मचाऱ्यांचे 11 तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. मागील तेरा वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून विविध पदावरील हे कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेमध्ये समायोजन करण्यासाठी हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाना या सर्व ठिकाणी एएनएम, जीएनएम, फार्मासीस्ट, लॅब टेक्निशियन, ड्रेसर अशा विविध पदावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 2007 पासून कामावर घेणे सुरू केले आहे. दरवर्षी या कर्मचाऱ्यांना 11 महिन्याचा कंत्राट दिला जातो. 2007 मध्ये कामावर लागलेल्या लोकांना 5000 वेतन होते. या 13 वर्षात हा पगार वाढून 12000 पर्यंत गेला आहे. या विरुद्ध जे लोक नियमित आहेत, त्यांचे पगार दुप्पट आहेत.

या कर्मचाऱ्यांना मासिक दहा ते बारा हजार रुपयावर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करावे लागत आहे. शासन नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना तेवढ्याच कामाचे सतरा ते वीस हजार रुपये मासिक मानधन देत आहे. काम सर्वांना सारखे, मग पैशांमध्ये एवढी तफावत का, कोव्हिड 19 च्या परिस्थितीत हे सर्व कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडत होते. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९ मे पासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून काम केले. दुसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तिसऱ्या टप्प्यात कोविड सेंटरवर मास्क सॅनिटाइझर न वापरता धोकादायक पद्धतीने सेवा दिली. मात्र एवढे केल्यावरही शासनाने त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात पुर्णत: काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर गेल्यामुळे कोव्हिड सारख्या अतिशय कठिण परिस्थितीत आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झालेला आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या आंदोलनकर्त्यांना दिले आहे. मात्र या अगोदर केलेल्या आंदोलनानंतर पोकळ आश्वासन देऊन आंदोलन संपविले होते. मात्र हा कामबंद आंदोलन तेव्हाच थांबेल जेव्हा शासन कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित सेवेत समायोजन करतील. समान काम समान वेतन याप्रमाणे वेतन देण्यात येईल. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर काही कंत्राटी कर्मचारी पोहोचले आहेत. त्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वी नियमित सेवेत सामावून घेण्याचे आदेश निघेल अशा मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोव्हिड कक्षासमोर एकत्र येवून नारे लावले.

ABOUT THE AUTHOR

...view details