भंडारा -अबब! भंडारा जिल्ह्यात महिलांनी वटसावित्रीनिमित्त चक्क वडाच्या झाडाला सॅनिटाझरचा दिवा लावून आणि वडाच्या झाडाला मास्कची ओटी भरत पूजा केली आहे. ऐकून धक्का बसला ना पण हे खरे आहे. वटसावित्री निमित्त वडाच्या झाड़ाजवळ ही अनोखी पूजा केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी शहरातील महिलांनी कोरोना पासून आपल्या पतींचे रक्षण व्हावे यासाठी ही नवीन पद्धतीची पूजा केली आहे.
वटसावित्रीची नवीन पद्धतीने पूजा आधुनिक सावित्रीपतीचे आयुष्य वाढविण्यासाठी महिला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. या वर्षी ही महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली मात्र एका वेगळ्या पद्धतीने. पूजेला निघालेल्या या महिलांच्या थाळी मध्ये नारळ, पूजेचे समान, दिवा आणि सॅनिटाझर आणि मास्क. सॅनिटाझरचा दिवा, मास्कची ओटी, भर वड देवा माझ्या पतीच्या आयुष्याची ज्योती हे गाणे म्हणत मोहाड़ी शहरातील महिला वटसावित्रीच्या पुजेला पोहचल्या.
कोरोनापासून बचाव करावा ही मागणीसध्याच्या कोरोना महामारीत मास्क आणि सॅनिटाझर. कोरोनाच्या या लाटेत अनेक लोकांचे बळी जाऊन अनेक़ संसार उद्भवस्त झाले आहे. आता तर चक्क कोरोनाची तीसरी लाट ह्या दोन कोरोना लाटेपेक्षाही भयंकर आहे. या कोरोना संसर्गापासून आपला पती दूर राहावा. कोरोनाने आपले कुंकू पुसले जाऊ नये. व कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून ह्या मोहाड़ी शहरातील महिला चोण्डेश्वरी मंदिर परिसरात वटसावित्री निमित्त चक्क वडाच्या झाडाला पूजा करत आहे. या तेलाचा दिवा न लावता सॅनिटायझरचा दिवा लावून मास्क मध्ये गहु,तांदूळ आंबा ठेवून त्याची चक्क ओटी भरली आहे. जिल्ह्यात ह्या अनोख्या पुजेला कोणी श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धा समजत आहे.
440 महिलांचे कुंकू पुसलेकोरोनाने अनेक संसार उद्भवस्त झाले आहे. एकटया भंडारा जिल्ह्याच्या विचार केला असता कोरोनाने जवळ जवळ 440 महिलांचे कुंकु पुसले गेले आहे. कर्ता पुरुषच कोरोनाने गिळकृत केल्याने अनेक कुटुंबावर उपासमारी आली आहे. त्यामुळे ही दुर्देवी परिस्थिती आपल्या वाटेला येऊ नये, यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. देशावरील कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात करोनाचीविषयी भिती आहेच. यात प्रत्येक जण आपापल्या परीने कोरोना पासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय करतांना दिसत आहे. त्याचाच एक प्रकार म्हणून मोहाडी येथील महिला वडालाच साकडे घालत आहेत.