भंडारा- शहरात मंगळवारपासून एकाच दिवशी दुकाने सुरू न होता वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे दुकाने सुरू होणार आहेत. या विषयीचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत. मुख्याधिकारी यांनी आदेश काढून कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरू राहतील, याविषयी माहिती पत्रकात दिली असल्याने भंडारा जिल्हातील व्यापाऱ्यांमधील सोमवार पासून निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.
मंगळवारी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हातील अत्यावश्यक वस्तूंची सर्व दुकाने यामध्ये भाजीपाला, किराणा, फळे, मांस मटण, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खानावळ व हॉटेल( पार्सल सुविधा फक्त) गॅरेज, रिपेरिंग व पंचर दुकान, कृषी विषयक सर्व दुकाने सर्वच दिवस आणि पूर्ण वेळ सुरू राहू शकतील. तर अत्यावश्यक वस्तू सोडून हार्डवेयर, बिल्डिंग मटेरियल, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक, आटोमोबाईल, टायर ट्यूब, कार ,बाईक शोरूम भांड्यांची दुकान, मोबाईल विक्री व दुरुस्ती,फोटो शॉप, स्वीट मार्ट, इतर सर्व प्रकारची दुरुस्ती केंद्रे ही केवळ तीन दिवस म्हणजे रविवार, बुधवार, आणि शुक्रवारला 11 ते 5 पर्यंतच सुरू राहतील.
भंडाऱ्यात दुकाने सुरू ठेवण्यासाठी नवीन नियमावली, वेगवेगळ्या दिवशी सुरू राहतील दुकाने तसेच सोमवार, गुरुवार, शनिवार या तीन दिवसांत कापड दुकान, बूट व चप्पल दुकान, ज्वेलरी, स्टेशनरी, गिफ्ट सेंटर, बुक स्टॉल, घड्याळ सेंटर, झेरॉक्स सेंटर, हे 11 ते 5 पर्यंत सुरू राहतील. या सर्व दुकांनासाठी सुरू करण्याची कोणतीही परवानगी लागणार नाही. या व्यतिरिक्त चहाच्या टपऱ्या, ज्यूस सेंटर, नास्ता पॉईंट, चायनीज सेंटर, केश कर्तनालाय, स्पा सेंटर, कोल्ड्रिंक व आईस्क्रीम पार्लर, स्नॅक्स कॉर्नर, पान व खर्रा टपऱ्या, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट (इथे इन हाऊस डायनिंग), व ढाबे पूर्ण पणे बंद राहणार आहेत.
सोमवार पासून भंडारा जिल्ह्यातील दुकाने सुरू होणार होती. मात्र जिल्हाधिकारी यांचे आदेश दुपारी आल्याने आणि त्यामध्ये कोणते दुकाने सुरू ठेवता येतील, किती वेळेसाठी सुरू ठेवता येतील, याविषयी स्पष्टपणे आदेश नसल्याने काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली आणि काही वेळाने पुन्हा बंद केली तर काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच केली नाही. शेवटी व्यापारी संघटने लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर यावर अश्या पद्धतीने तोडगा काढण्यात आला. दुकाने सुरू ठेवतांना दिलेले नियम न पाळणाऱ्या दुकानचालकांवर आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार आहे.