भंडारा- आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा येथील शासकीय गोदमावर धाड मारली. यावेळी आढळलेला सर्व तांदूळ आणि गहू अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत धान्य पुरवठा करणारे मिलर्स आणि त्यांना सहकार्य करणारे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पणन अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी भोंडेकर यांनी केली आहे. राईस मिलर्स कडून मिळणारे तांदूळ, गहू आणि डाळ निकृष्ट दर्जाचे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.
दरवर्षी आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून मिलर्सला धानापासून तांदूळ बनविण्यासाठी ( भरडाई साठी) धान दिले जातात. मिलर्स चांगल्या क्वालिटीचे धान घेऊन जातात. मात्र, तांदूळ पुरवठा करताना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये साठवलेला निकृष्ट तांदूळ शासनाला पुरवठा करतात. हे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिक धान्य पुन्हा बाजारात विकत असल्याचे चित्र दिसून येते. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा येथील शासकीय गोदामावर धाड टाकली. तहसीलदार पोयाम,अन्न पुरवठा निरीक्षक पडोळे यावेळी उपस्थित होते.