भंडारा- केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तरीही भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही, असे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर करून युतीच्या राजकारणात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
केवळ ४८ तासांचा कालावधी उर्वरित असूनही भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अशातच शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी एक घोषणा करून भाजप नेत्यांमध्ये गोंधळाची आणि संभ्रमाची स्थिती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील २ वर्षापासून भाजप शिवसैनिकांची गळचेपी करून त्यांच्यावर सतत अन्याय करत आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर भंडाऱ्याला शिवसेनेचे दिपक सावंत हे पालकमंत्री म्हणून लाभले. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना सह पालकमंत्री बनवून भाजपने आपले राजकारण सुरू केले. शेवटी दिपक सावंत यांनी पालक मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बावनकुळे यांना भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बनविले गेले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आणि स्थानिक भाजप नेत्यांनी शिवसेने लोकांना वेगवेगळ्या सर्व समितीतून बाहेर काढले. तेव्हापासुन शिवसैनिकांमध्ये धुसफूस सुरू झाली. आता निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी शिवसेनेला भंडाऱयामध्ये भाजपचे लोक विश्वासात घेत नाहीत, असा आरोप शिवसैनिक करीत आहेत. त्यामुळेच येथील शिवसैनिक कार्यकर्त्यांसह एक बैठक घेऊन त्या अनुषंगाने भाजपला २०१९ च्या लोकसभेमध्ये मदत करायची नाही, त्यांना मतदानही करायचे नाही, असे ठरवण्यात आले आहे.