भंडारा -जवळपास ४ वर्षांपासून विद्यार्थ्यांनी नौकायन खेळाचा सराव सुरू केला. मात्र, त्यासाठी लागणारे साहित्य महाग होते. त्यामुळे सराव शक्य होत नव्हता. त्यासाठी एका तरुणाने स्वतःची एलआयसी पॉलिसी गहाण ठेवून साहित्य घेतले आणि सराव सुरू केला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नौकायन खेळाचा २०१९ मध्ये नागपूर विद्यापीठामध्ये समावेश झाला. त्यानंतर आता सहा ते सात फेब्रुवारी असे दोन दिवस भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर पहिल्यांदाच विद्यापीठस्तरीय नौकायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला फळ आले आहे.
सरावासाठी स्वतःची एलआयसी पॉलिसी ठेवली गहाण, अन् नौकायन स्पर्धा सुरू होताच... विदर्भात नौकायन खेळाविषयी काहीही माहिती नव्हती. मात्र, भंडारा जिल्ह्यातील 3 तरुणांनी एकत्र येत या खेळाविषयी माहिती जाणून घेतली. पुणे येथे जाऊन या खेळाविषयी माहिती मिळवून घेतली आणि नंतर हा खेळ जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्धार केला. यासाठी लागणारी नाव अतिशय महागडी असल्यामुळे एका तरुणाने चक्क स्वतःची एलआयसी पॉलिसी गहाण ठेवून एक नाव घेतली आणि सरावाला सुरुवात केली. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली. आलेल्या सर्व अडचणीवर मात करत हा सराव मागील चार वर्षापासून सतत सुरू आहे. जवळपास 40 विद्यार्थी या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. खेळाडूंनी विविध राज्यात जाऊन पदक सुद्धा मिळविले आहे. मात्र, विदर्भातील या खेळाला आणि त्यांच्या खेळाडूंना खरी ऊर्जा आणि खरे पदक 2019 मध्ये मिळाले. कारण त्यावेळी नागपूर विद्यापीठामध्ये या खेळाचा समावेश करण्यात आला.
या खेळांमध्ये वापरले जाणारे नाव आणि चप्पू हे दोन्ही अतिशय महागडे असतात. भंडाऱ्यामध्ये सध्या मोफत प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे त्यांचे मार्गदर्शक हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांनी अनेक लोकांच्या मदतीने हे साहित्य खरेदी केले. मात्र, आजही बऱ्याच साधनांची गरज आहे. तसेच या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान पौष्टीक आहाराची गरज आहे. आता या खेळाचा नागपूर विद्यापीठात समावेश झाल्यामुळे या सर्व कमतरता भरून निघतील आणि त्यामुळे विदर्भातून दर्जेदार खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा प्रशिक्षक व्यक्त करत आहेत.
विद्यापीठात या खेळाचा समावेश करण्यासाठी येथील प्रशिक्षक बऱ्याच वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाला नागपूर सिनेट सदस्य प्रवीण उदापूर यांची साथ मिळाली. या सर्वांच्या प्रयत्नानंतर या खेळाचा विद्यापीठात समावेश झाला. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर हे खेळाडू केवळ नागपूर विद्यापीठाचे नाही, तर संपूर्ण देशाचे नावलौकिक करतील, असा विश्वास देखील परीक्षकांनी व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या विद्यापीठीय स्पर्धेच्या विजेत्यांनची राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड केली होणार आहे. यामध्ये विद्यापीठाशी संलग्नित १५ महाविद्यालयाचे जवळपास ५० विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे.
खेळाचा विद्यापीठात समावेश झाल्यामुळे या खेळाडूंना 25 गुण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळते. त्यामुळे त्यांचे भवितव्य ठरविण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.