भंडारा - अनैतिक प्रेम संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील नंदकिशोर सूरजलाला राहांगडाले (वय 34) याची हत्या त्याच्या पत्नीने करून त्याचा मृतदेह पोत्यात गुंडाळून नदीत टाकला होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्याकांडाचा तपास पूर्ण करून आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह तिघांना अटक केली आहे.
मागील चार वर्षांपासून होते अनैतिक संबंध
गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यतील नवाटोला या गावात राहणाऱ्या नंदकिशोर राहांगडाले हा घर बांधकाम ठेकेदार होता. तो पत्नी आणि दोन मुलांसह सुखी संसार जगत होता. मात्र नंदकिशोर याची पत्नी आरोपी योगेश्वरी उर्फ गुड्डी राहांगडाले (३२) हिचे गावालगत राहणारा सोमेश्वर पूरनलाल पारधी (वय 39, रा. पाथरी) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. जवळपास चार वर्षापासून हे अनैतिक संबंध या दोघांनी सुरू ठेवले होते. मात्र या अनैतिक संबंधाविषयी नंदकिशोरला समजताच तो या अनैतिक संबंधातील अडसर ठरू लागला आणि म्हणून त्यांची हत्या करण्याची योजना आखली गेली.
अशी झाली हत्या
नंदकिशोर हा त्याच्या पत्नीला घेऊन नागपूरला काही कामानिमित्त गेला होता. घटनेच्या दिवशी म्हणजे चार तारखेला नंदकिशोर पत्नीला घेऊन दुचाकीने भंडारामार्गे त्याच्या गावी नवाटोलाला जात होता. ही माहिती आरोपी योगेश्वरी हिने तिच्या प्रियकराला दिली होती. ठरल्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यात सालेभाटा फाटा गावाजवळ नंदकिशोर आणि त्याची पत्नी थांबली. त्याचवेळी ह्युंदाई आय टेन या चारचाकी वाहनाने आरोपी सोमेश्वर पूरनलाल पारधी आणि त्याचा सोबती लेखराम ग्यानिराम टेंबरे राहणार मुंडीपार हे गाडीतून उतरले आणि त्यांनी एका लोखंडी रॉडने मृतक नंदकिशोर यांच्या डोक्यावर वार केले. पुरावे नष्ट करण्यासाठी नंदकिशोर याला पोत्यात गुंडाळून त्याचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकण्यात आला.
केवळ 24 तासात आरोपींना अटक
शुक्रवारी वैनगंगा नदीत पोत्यात गुंडाळून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना मिळाला. पोलिसांनी त्या मृतदेहाची तपासणी करून शवविच्छेदनासाठी पाठविले आणि तपासाला सुरुवात केली. तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला. सुरुवातीला त्या व्यक्तीची ओळख पटविण्यात आली आणि त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात जाऊन तपास सुरू करण्यात आला. या तपासाअंती त्याच्या पत्नीने नंदकिशोरची हत्या केली असल्याचे पोलिसांना समजले. नंदकिशोरची पत्नी, तिचा प्रियकर आणि एक त्याचा एक साथीदार अशा तिन्ही लोकांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कलम 302 आणि 201नुसार गुन्हा दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.