भंडारा - शहरात भरदिवसा एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. उधारी दिलेले केवळ बाराशे रुपये मागण्याकरिता गेलेल्या युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील चांदणी चौक येथे गुरुवारी घडली. विक्की रामचंद्र भुरे (वय, 28) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी महेश तरारे (रा. चांदणी चौक, भंडारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
भरदिवसा केवळ बाराशे रुपयांसाठी एका तरुणाची हत्या छोट्या चाकूने केला वार -
मृत विक्की त्याच्या वाडिलासह नाश्त्याची टपरी चालवितो. परिसरातील अनेक युवकांना त्याने उधार उसने पैसे दिले होते. मागील काही महिन्यापासून सततची टाळेबंदी व वेळेच्या मर्यादेमुळे दुकानातून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे तो आर्थिक तंगीत असल्याने उधारीच्या पैशाकरिता उसने घेणाऱ्यांकडून त्याने पैसाची मागणी सुरू केली. आरोपी महेश तरारे यानेही विक्की कडून बाराशे रुपये घेतले होते. दरम्यान 1 जुलै रोजी 1 वाजताच्या सुमारास विक्की महेशच्या घरी पैसे मागण्यांकरिता गेला. यावेळी या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान रागाच्या भरात महेशने स्वयंपाक घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून पोटात खूपसला. पोटावर वार होताच जखमी अवस्थेत विक्कीने तिथून पळ काढत आपले घर गाठले. त्याच्या मोठ्या भावाने एका मित्राने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु येथे विक्कीने उपचाराआधीच जीव सोडला. एकमेव जखम आणि तीही खूप छोटी जखम होती. मात्र फुफ्फुसाला इजा झाल्याने अधिक रक्तस्त्राव होऊन विक्कीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
केवळ दोन तासात आरोपीला अटक -
हत्येची माहिती मिळताच भंडारा पोलीस निरीक्षक लोकेश काणसे त्यांच्या चमुसह घटनास्थळी पोहचले आणि चौकशी करून केवळ 2 तासात आरोपी महेशला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक लोकेश काणसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. केवळ 1200 रुपयांसाठी एका तरुणाचा जीव गेला ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे.