भंडारा -शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या नाना पटोले यांची आज (रविवारी) विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. ते भाजपमध्ये खासदार म्हणून निवडून गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे भाजपचे पहिले खासदार ठरले होते. त्यांच्या निर्भीडपणाचेच पारितोषिक त्यांना आज मिळाले आहे. विधानसभेच्या सर्वोच्चपदी विराजमान होणारे भंडारा जिल्ह्यातील ते पहिलेच नेते आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना त्याचा अभिमान आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, असे असले तरी नाना पटोले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील लोकांची आणि समर्थकांची होती.
साकोलीचे नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध कोण आहेत नाना पटोले?
नाना फाल्गुनराव पटोले असे त्यांचे पूर्ण नाव आहे. साकोली तालुक्यातील सुकळी या छोट्याशा गावात 5 जून 1962 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे एम. कॉमपर्यंत शिक्षण झाले असून आतापर्यंत ते 4 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार झाले आहेत. 1991 मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद न सदस्य म्हणून निवडून आले यानंतर 1994 मध्ये भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक म्हणून ते निवडून आले. यानंतर 1997 पासून तर आतापर्यंत विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग येथे संचालक पदावर आहेत. तसेच 1999 मध्ये पहिल्यांदा ते लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून 17 हजार मतांनी आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांची कार्यशैली आणि कार्यपद्धतीमुळे ते लोकांमध्ये खूप प्रचलित झाले. 2004 मध्ये दुसऱ्यांदा लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून निवडून आले. यावेळेस त्यांनी तब्बल 45 हजार मतांनी विजय मिळविला होता. 2008 हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी धानाची पेंडी जाळत काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2009 मध्ये अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढवली. मात्र, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला.
हेही वाचा -हिवाळी अधिवेशनानंतरच राज्याला मिळणार 'उपमुख्यमंत्री'
2009 मध्ये नाना पटोले यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर साकोली-लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी तब्बल 65,000 मतांनी विजय मिळविला होता. त्यावेळचा हा राज्यातील दुसरा क्रमांकाचा मताधिक्य होता. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी केंद्रीय मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांनाच तब्बल दीड लाख मतांनी हरविले होते. मात्र, केंद्रात गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि पक्षातूनच पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करणारे ते पहिले खासदार ठरले.
2017 मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि ते वर्षभरात पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले. 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे रिंगणात होते. भाजपने या निवडणुकीतही आपली संपूर्ण ताकद लावली होती. त्यांच्या सर्व भाषणात उमेदवारापेक्षा नाना पटोले हेच लक्ष होते. मात्र, या निवडणुकीतही नाना पटोले यांचा जादू चालली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे निवडून आले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षात परत आल्यानंतर काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय किसान सेलचे अध्यक्ष बनवले.
हेही वाचा -बाळासाहेबांचं नाव घेणारच; भाजपच्या आक्षेपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे हेवीवेट मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नागपूर मधून निवडणूक लढविली. मात्र, या निवडणुकीत यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या स्वगृही परत येत साकोली विधानसभा क्षेत्रातून विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार बाळा काशीवार यांची टिकीट कापले आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे सदस्य तसेच पालकमंत्री परिणय फुके यांना रिंगणात उभे केले. यासाठी साकोलीत पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्यात आली. मात्र, भाजपला इतके प्रयत्न केल्यानंतरही नाना पटोले यांना त्यांच्या साकोली-लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून हरविणे भाजपाला कठीण गेले. या निवडणूकीत नाना पटोले यांचा 7 हजार मतांनी विजय झाला.
निवडणुकीनंतर नाना पटोले यांचा अनुभव पाहता काँग्रेसकडून त्यांना एखादे कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांची आणि जिल्हावासियांची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीतर्फे त्यांना विधानसभेचा अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली. अध्यक्ष पद हे जरी मोठे पद असले तरी जिल्ह्याच्या दृष्टिकोणातून जर नाना पटोले हे मंत्री झाले असते तर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ते फायद्याचे ठरले असते, अशी भावना जनतेकडून व्यक्त केली जात आहे.