भंडारा- माजी खासदार प्रफुल पटेल हे मागील 32 वर्षात स्वतः मोठे झाले, मात्र जिल्हा मोठा झाला नाही. जिल्ह्याचा विकास न झाल्याने यावर्षी लोकांनी त्यांना नाकारल्याचे मत नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे मंगळवारी प्रफुल पटेल आणि नाना पटोले या दोन्ही नेत्यांनी भंडाऱ्यातील निकालावर आश्चर्य व्यक्त केले होते.
निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन भविष्यातील नियोजनाविषयी खासदार मेंढे यांनी माहिती दिली. माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांविषयी यावेळी त्यांना विचारण्यात आले. त्यावर 'मागील पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामे केली. त्यामुळे लोकांनी फिर एक बार मोदी सरकार असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. मी स्वतःला एक लहान कार्यकर्ता असून या जिल्ह्यातील लोकांसाठी नक्कीच काही चांगल्या गोष्टी करू शकतो, हे लोकांना पटवून देऊ शकलो. म्हणूनच भंडारा गोंदियाच्या लोकांनी भरघोस मतांनी मला निवडून दिले. हे फक्त भंडाऱ्यामध्येच झाले नाही. तर ज्या ज्या पोट निवडणुकीत आम्ही हरलो, त्या सर्व पोट निवडणुकीत आम्ही भरघोस मताधिक्याने जिंकल्याचेही ते म्हणाले.