भंडारा- आधी वीज बिल माफ करू असे सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवणाऱ्या वीज वितरण कंपनीने नंतर मात्र बिल भरा अन्यथा वीज जोडणी तोडू असा फतवा काढला. त्यानंतर वीज वितरण कंपनींकडून आतापर्यंत 807 जणांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. बिल थकीत असलेल्या ग्राहकांना महावितरणने शॉक देण्याची कारवाई सुरू केल्याचे बिल न भरणाऱ्या नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणच्या या ॲक्शन वर भाजपने रिॲक्शन देत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
बिले न भरणाऱ्यांना महावितरणचा दणका ऊर्जा मंत्र्यांच्या घुमजावामुळे वाढल्या अडचणी-कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज बिलाची माफी किंवा त्यात सूट देण्यात येईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती आणि त्याचे कारणही तसेच होते. राज्याचे ऊर्जामंत्री यांनी स्वतः याची शक्यता बोलून दाखवली होती. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला नव्हता. आजही नागरिकांची परिस्थिती अवास्तव आलेले वीज बिल भरण्याची नाही. तरीही शक्य तेवढे बिल भरण्याचा प्रयत्न ग्राहकांकडून होत आहे.
मागील आठ दिवसांपासून सुरू झाली कारवाई-कोरोना काळातील थकीत बिल न भरल्यास विद्युत जोडणी कापू, असा फतवा काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काढला होता. त्याची सुरुवात आता भंडारा जिल्ह्यात झाल्याचे दिसून येत आहे. ज्या ग्राहकांनी एप्रिल 2020 पासून एकदाही वीज बील भरलेले नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 807 ग्राहकांवर कार्यवाही करीत वीज खंडीत करण्यात आली आहे. अचानक करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य वीजग्राहकांमध्ये असंतोष आहे.
मिटिंगमध्ये मिळाले आदेश-सोमवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत वीजबील थकीत असणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा खंडीत करण्याबाबत तोंडी आदेश देण्यात आल्याचे उपकार्यकारी अधिकारी राजन लिमजे यांनी सांगितले.
भाजपाची रिअॅक्शन-राज्यातील महाविकास आघाडी सरकार मनमानी कारभार करत आहे. अडचणीच्या काळात गोरगरीब जनतेचे विद्युत बिल माफ करण्याऐवजी त्यांचे विद्युत कनेक्शन कापण्यात येत आहेत. या मनमानीविरोधात भाजपा रस्त्यावर उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवराम गोऱ्हेपुंजे यांनी सांगितले.