महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोहंगाव देवी शाळेतील विद्यार्थ्यांचा नववर्षात व्यसनमुक्तीचा जागर - human chain in bhandara

मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी थर्टी फर्स्टच्या दिवशी व्यसनमुक्तीचा अनोखा, कौतुकास्पद उपक्रम राबवत आगामी वर्ष आनंददायी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जागर केला.

Mohgaon Devi school organised human chain for cigarette alcohol and tobacco Awakening
मोहंगाव देवी शाळेतील विद्यार्थ्यांचा नववर्षात व्यसन मुक्तीचा जागर

By

Published : Jan 2, 2021, 7:23 AM IST

भंडारा -देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू आहे. नूतन वर्षाला तरुणाईमध्ये थर्टी फर्स्टचा उत्साह दिसून आला. मात्र मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी थर्टी फर्स्टच्या दिवशी व्यसनमुक्तीचा अनोखा, कौतुकास्पद उपक्रम राबवत आगामी वर्ष आनंददायी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जागर केला. या उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे.

धूम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागरण

अलीकडे लहान बालकांपासून ते वृद्धापर्यंत सिगारेट ओढण्याचे व दारू, तंबाखू सेवनाचे प्रकार झपाट्याने वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून माणसाच्या जगण्याशी, संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही. तोच धागा पकडून मोहगावदेवी येथील महात्मा जोतिबा फुले शाळेतर्फे जागतिक धूम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागरण करण्यात आले. मुख्याध्यापक राजकुमार बांते यांच्या संकल्पनेतून हंसराज भडके, हेमराज राऊत, गजानन वैद्य, गोपाल मडामे, शोभा कोचे, लीलाधर लेंडे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांच्या सहकार्याने उपक्रम साकार करण्यात आला.

मोहंगाव देवी शाळेतील विद्यार्थ्यांचा नववर्षात व्यसनमुक्तीचा जागर...

व्यसनमुक्तीचे फलक घेऊन मानवी साखळी
शाळेच्या समोरील भंडारा-तुमसर राज्य मार्गाच्या कडेने उभे राहून धूम्रपान करण्याचे दुष्परिणाम करणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेऊन जागर केले. तसेच कोरोनाचे संकट अजून संपले नाही. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा, वारंवार हात धुवा, स्वच्छता राखा असे संदेश देणारे फलकही विद्यार्थ्यांच्या हाती दिसून आले. तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छासुद्धा फलकाद्वारे गावकऱ्यांना व राज्य मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिल्या जात होते. मुलांनी अर्धा किलोमीटर लांब रांग लावून साखळी बनविली होती. मार्गक्रमण करणाऱ्यांच्या नजरा त्या फलकांकडे वळत होत्या. काहीजण एक क्षण थांबून फलक वाचताना दिसत होते. या उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत असून शाळेचे कौतुक केले जात आहे. या जागर कार्यक्रमात नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग केला होता. याप्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार बांते म्हणाले, शाळेतील विद्यार्थी संदेश वाहक आहेत. त्यांच्या माध्यमातून तरुण व्यसनापासून परावृत्त व्हावेत, असा छोटासा समाजकार्याचा व जागराचा प्रयत्न शाळेच्या वतीने करण्यात आल्याचे सांगितले.

हेही वाचा -भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजीपाल्याची विमानाने होणार परराज्यात वाहतूक

हेही वाचा -भंडारा: शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची वजन मापात लूट

ABOUT THE AUTHOR

...view details