भंडारा- मला पक्षातील काही लोकांनी तुरुंगात घातले. ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र रचले त्यांचे नाव पोलीस तपासानंतर आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे येईलच. माझ्यावर विनयभंगाचा आरोप एका महिला पोलीस उपनिरीक्षकांनी केला. तर मला अटक करणाऱ्या महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, माझ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नाही. पोलिसांमध्ये मतभेद असल्यामुळे हे स्पष्ट दिसत आहे की हा माझ्याविरुद्ध रचलेले कट-कारस्थान आहे. यामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा आरोप चरण वाघमारेंनी केला आहे.
विनयभंगाच्या आरोपावरून अटक झालेल्या आमदार चरण वाघमारे यांनी अटकेनंतर जामीन न घेण्याचे निर्णय घेतला होता. मात्र, अटकेनंतर पालकमंत्री परिणय फुके, खासदार सुनील मेंढे आणि म्हाडाचे अध्यक्ष तारीख कुरेशी यांनी तुरूंगात वाघमारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री आणि गडकरींचा संदेश दिला. मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी मला जामीन घेण्यासाठी विनंती केली. वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊनच मी जामीन अर्जावर स्वाक्षरी केली असल्याचे चरण वाघमारे यांनी सांगितले.