भंडारा - भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आले असून, मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून भाजपचा मुस्लीम चेहरा असलेले विद्यमान म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांनी अचानक गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी भाजपच्या प्राथमिक सभासत्वाचा राजीनामा दिल्याने सध्या पक्षांतर्गत चर्चांना तोंड फुटले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे तारिक कुरेशी यांना राजीनामा परत घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी सांगितले.
भाजपचा मुस्लीम चेहरा असलेले विद्यमान म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांनी अचानक गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे. पालकमंत्री परिणय फुके यांना जिल्ह्याची जबाबदारी सोपवल्यानंतर भाजपमध्ये तुमसर विधानसभा मतदारसंघात गटबाजीचे वातावरण आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.
आमदार वाघमारे यांची पक्षाने 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. तारिक कुरेशी हे त्यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावरही याप्रकारचे आरोप होत आहेत. तसेच त्यांना मिळणारी वागणूक योग्य नसल्याचे सांगत कुरेशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कुरेशी हे जिल्ह्याचे मोठे नेते असून, त्यांनी कोणत्या कारणास्तव राजीनामा दिला हे माहित नसल्याचे भाजप उमेदवार प्रदीप पडोळे यांनी सांगितले. तसेच त्यांना राजीनामा परत घेण्याची विनंती केल्यास ते आमच्या शब्दाचा मान ठेवतील असा विश्वास पडोळे यांनी व्यक्त केला.
एका निस्वार्थ सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रासून राजीनामा द्यावा लागतो, हे भाजपचे मोठे अपयश आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे बंडखोर नेते चरण वाघमारे यांनी दिली.