भंडारा - जिल्ह्यात पहिल्यांदाच मोक्कांतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तुमसर तालुक्यातील संघटित गुन्हेगारी करणाऱ्या दोन टोळ्यांच्या 13 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
यांच्यावर झाली कारवाई
तुमसर शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी भंडारा पोलीस दलाने दोन टोळ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये दिनेश उर्फ डाल्या मेश्राम (48 वर्ष), या टोळीच्या प्रमुखासह शुभम उर्फ झब्या देवेंद्र कटकवार (24 वर्ष), मनोज देविदास कानेकर (36 वर्ष), भूपेंद्र मोहन गिलोरकर (32 वर्ष), मयूर उर्फ गप्या रविकांत सांडेकर (24 वर्ष), रत्नपाल उर्फ कालू हेमराज माटे (48 वर्ष), रफिक निसार शेख (38 वर्ष) आणि नईम शिराज शेख (48 वर्ष) तर दुसऱ्या टोळीतील प्रमुख सतीश चंदन दहाट (28 वर्ष), संतोष चंदन दहाट (32 वर्ष), सौरव नंदकिशोर माने (24 वर्ष), मंगेश प्यारेलाल गेडाम (24 वर्ष) आणि जितू अशोक बन्सोड (35 वर्ष, रा. तुमसर), अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
गुन्हेगारांसाठी कुप्रसिद्ध होता तुमसर शहर
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहर हा मागील अनेक वर्षांपासून सराईत गुन्हेगारांमुळे कुप्रसिद्ध होता. तुमसर तालुक्यात सातत्याने हत्या, हत्येचे प्रयत्न, खंडणी यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असतात. शहरात गत काही वर्षांपासून दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात या टोळक्यांनी एकमेकाच्या टोळ्यातील लोकांची निर्दयपणे हत्या केलेली आहे. संतोष दहाट याने 2015 मध्ये तुमसरचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर देशी काट्यातून गोळी झाडून हत्या केली. तुरुंगवास भोगल्यानंतर 2017 मध्ये बाहेर आल्यावर प्रशांत उके यांचा धाकटा भाऊ हेमंत उके यांचीही गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. तर याच संतोषवर दुसऱ्या टोळीने काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला केला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संतोषवर हल्ला झाल्यानंतर आता या टोळीचा नेतृत्व त्याचा लहान भाऊ सतीश दहाट करत आहे.