भंडारा - जिल्ह्यातील किराणा आणि भाजीपाला दुकानात येणाऱ्या ग्राहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांनी शिस्तीत राहावे यासाठी बुधवारपासून, बाजार पेठेतील बाजार गावाबाहेरील उघड्या मैदानावर भरविण्यात आले. तर, किराणा, दूध आणि औषधांच्या दुकानात 1 मीटरचे अंतर ठेवण्यासाठी मार्किंग केली गेली. मात्र तरीही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली, नागरिक आवशक्यतेपेक्षा जास्त किराणा खरेदी करतांना दिसले. तर, सायंकाळी 5 नंतर बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्स राखावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला लक्षात घेत भंडारा जिल्हाधिकारी यांनी लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना गर्दी करू नये, एकमेकांपासून 1 मीटरचे अंतर ठेवावे. या दृष्टीने बुधवारपासून दोन नवीन योजना आखल्या. यामध्ये, भाजीपाला खरेदीसाठी वस्तीत असलेल्या भाजी दुकानात नागरिक मोठी गर्दी करत असल्यामुळे हे भाजी दुकान शहराच्या दसरा मैदान आणि रेल्वे मैदान या ठिकाणी भरविण्यात आले. त्यासाठी एक फुटाच्या नंतर 4 बाय 8 फुटांचे चुन्याने चौकोन आखण्यात आले.