भंडारा: जिल्ह्यातील तुमसर येथील सराफा व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा ध्रुवील या तिघांचा २६ फेब्रुवारी 2014च्या मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून ८.३ किलो सोने, ३४५ ग्रॅम चांदी आणि ३९ लाख रुपये रोख असे साडेतीन कोटींचा ऐवज पळविला होता. घटनेतील चार आरोपींना तुमसरातून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले (रा.तुमसर), सोहेल शेख, रफीक शेख (रा. नागपूर) यांचा समावेश आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तुमसर पोलिसांनी या प्रकरणात ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
Soni Murder Case : भंडाऱ्यातील तिहेरी हत्याकांडातील सात दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - सोनी परिवार हत्याकांड निकाल भंडारा
वाढदिवसाच्या दिवशी ध्रुविलला न्याय मिळाला असून त्याची आणि त्याच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या करणाऱ्या ७ ही नराधमांना मंगळवारी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश अस्मर यांनी तिहेरी जन्मठेपेची (आजीवन कारावास) शिक्षा सुनावली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील 2014 मध्ये घडलेल्या बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा आज (मंगळवारी) निकाल लागला आहे. मृतक ध्रुवील याचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने त्याच्या मृत आत्म्याला आज न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निकालानंतर दिली आहे.
दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा: हत्या करणाऱ्या या सातही नराधमांना आज जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणांमध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी नसतानाही पोलिसांनी केलेल्या योग्य तपासामुळे आणि त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे हत्याकांडातील या सातही आरोपींविरुद्ध अपराध सिद्ध करणे शक्य झाले असल्याचे वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील एकूण ४६ साक्षीदार तपासले आहेत. ते 1970 पासून चोरीच्या प्रकरणातील आरोपी आहेत; मात्र त्यांना अजून पर्यंत कुठलीही शिक्षा न झाल्यामुळेच एवढा मोठा हत्याकांड घडवून आणल्याचे आम्ही न्यायालयाच्या निर्देशात आणून दिले असल्याचे निकम यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही केली; मात्र न्यायालयाने त्यांना हत्या, दरोडा, आयपीसी ४४९ कलामाखाली (तिहेरी जन्मठेपेची) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली असल्याचे वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
दोषींच्या फाशीची अपेक्षा:या निकालानंतर कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले असले तरी आरोपींना फाशी व्हावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांची होती; मात्र जो निकाल न्यायालयाने दिला त्याचा निकालाची प्रत हातात आल्यानंतर विचार करून पुढील निर्णय घेऊ, असे कुटुंबीयांनी सांगितले. सरकारी वकिलांच्या आरोपपत्रात बऱ्याच त्रुटी असून आमच्या लोकांना फसविल्या गेले आहे. आजच्या निकालाची प्रत हातात आल्यानंतर या निकाला विरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू, असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले.
हेही वाचा:Rat Killing Case : उंदराची केली निर्घृण हत्या, पोलिसांनी दाखल केले ३० पानी दोषारोपपत्र