भंडारा - कोरोनामुळे लॉकडाऊनकाळात आरोग्य विभागाअंतर्गत होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या दोघांनी व इतर दोन दुकानदारांनी शासन निर्देशाचे ऊल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने सबंधितांना शिक्षा ठोठावली आहे. चंद्रकांत भागवत आमगवार (२२) रा. रोहणी, तर प्रकाश गोपीनाथ धोटे (२५) डांभेविरली अशी शिक्षा झालेल्या दोन होम क्वारंटाइन दोषींची नावे आहेत. मुलचंद पंढरी प्रधान (४७) रा.डोकेसरांडी व नंदकिशोर टिकाराम डोंगरवार (३४) रा. लाखांदूर अशी दोन दोषी दुकान चालकांची नावे आहेत.
चारही आरोपींनी लॉकडाऊनमध्ये शासन निर्देशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने सबंधितांच्या विरोधात लाखांदुर पोलिसांत भांदविचे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. याप्रकरणाचा खटला लाखांदुर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात जलदगतीने चालविण्यात आला होता.
या खटल्यात चारही आरोपीतांच्या विरोधात दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने सबंधितांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड अथवा दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदरच्या निकालाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असुन शासन निर्देशानुसार तालुक्यातील सर्व होम क्वारंटाइन व्यक्तींनी तसेच जीवनावश्यक दुकानांखेरीज अन्य दुकानदारांनी व तालुक्यातील सबंध जनतेनी शासन निर्देशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन लाखांदुर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जमावबंदी व संचारबंदी केली असतांना काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन होणार नाही. समाजातील अन्य घटकांना सदरच्या गैरकृत्यामुळे त्रास होणार नाही अथवा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरी राहून शासन प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन लाखांदुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.