भंडारा- जिल्ह्यात अटल विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेच्या लाभासाठी नोंदणी आहे. नोंदणीसाठी सुरक्षा कीट मिळविण्याच्या ठिकाणी नियोजनाच्या अभावामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मात्र, कामगार अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे एखादी अनुचित घटना होण्याची वाट हे अधिकारी पाहत आहेत का, असा प्रश्न कामगार करीत आहेत.
असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा, म्हणून शासनाने अटल विश्वकर्मा बांधकाम कामगार योजना सुरू केली. योजनेचे फायदे मिळविण्यासाठी कामगारांना नोंदणी करावी लागते. भंडारा जिल्ह्यात झालेल्या पहिल्या टप्प्याच्या नोंदणीमध्ये ३० हजार कामगारांनी नोंदणी करून घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला पुन्हा सुरुवात झाली आहे. ही नोंदणी तालुका स्तरावर होत असल्याने भंडारा नगरपालिकेत हजारो लोकांची नोंदणीसाठी झुंबड उडत आहे. नोंदणीचा फॉर्म भरण्यासाठी नगरपालिकेमध्ये हे कामगार सकाळपासूनच येऊन ठेपलेले असतात. कामगारांच्या प्रचंड गर्दीमुळे नगरपालिकेच्या इमारतीच्या आत आणि परिसरात कामगारच दिसतात. इमारतीच्या आत पाय ठेवण्यासाठीही जागा नाही. काही वेळा इमारतीते दार लावून लोकांना बाहेर ठेवल्या जाते. या कामगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणा नाही. हजारो लोक एकाच वेळेस आल्याने त्यांना सांभाळणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.