महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात कोरोना वॉर्डात मिळतो खर्रा अन् दारू; रुग्णांचा गंभीर आरोप

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतलेल्या लोकांचा अनुभव अतिशय वाईट आहे. रुग्णांना एका खोलीत डांबून ठेवले जाते. त्या खोलीच्या बाहेर गेटला कुलूप लावले जाते. या रुग्णांना पिण्याचे पाणी हवे असल्यास बाहेरून आवाज द्यावा लागतो. बऱ्याचदा 2 ते 3 तासानंतर पाणी मिळत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.

COVID Hospital News
कोविड रुग्णालय

By

Published : Aug 18, 2020, 7:25 PM IST

Updated : Aug 18, 2020, 7:32 PM IST

भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना विभागात 50 रुपयात खर्रा आणि 300 रुपयात दारु मिळते. ऐकून आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. इथे रुग्णांसाठी आवश्यक सुविधांच्या मोठ्या प्रमाणात उणिवा आहे. रुग्णांना निकृष्ट अन्न आणि अस्वच्छ पाणी प्यायला लागत असून तपासणीसाठी डॉक्टर येत नसल्याची तक्रार आहे. तसेच रुग्णांना एका खोलीत डांबून ठेवले जात असल्याचा अनुभव तिथे 10 दिवस राहिलेल्या एका रुग्णाने सांगितला आहे.

भंडाऱ्यात कोरोना वॉर्डात मिळते खर्रा आणि दारू
रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह येताच त्यांना आयसोलेशन वार्डामध्ये उपचारासाठी आणले जाते. अशा रुग्णांना दहा दिवस येथे ठेवले जाते. या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना सकस आहार दिला जातो, तसेच त्याठिकाणी ते आनंदी राहावे यासाठी मानसिक किंवा शारीरिक त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाते. मात्र, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतलेल्या लोकांचा अनुभव अतिशय वाईट आहे. रुग्णांना एका खोलीत डांबून ठेवले जाते. त्या खोलीच्या बाहेर गेटला कुलूप लावले जाते. या रुग्णांना पिण्याचे पाणी हवे असल्यास बाहेरून आवाज द्यावा लागतो. बऱ्याचदा 2 ते 3 तासानंतर पाणी मिळत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. सकाळी नाश्त्यात फक्त पोहे देण्यात येतात आणि ते फारच निकृष्ट दर्जाचे असल्याचे या रुग्णांनी सांगितले. तर, जेवणातदेखील रोज वांग्याची भाजी, पालक डाळ आणि डाळ वांगी या तीन प्रकारच्याच भाज्या मिळतात, पिण्याचे पाणी अशुद्ध असते. त्यामुळे येथे उपचार घेणारे बरेच जण घरून जेवण आणि पाणी मागवत असल्याचे रुग्णांनी सांगितले. डॉक्टर तपासणीसाठी किंवा साधी विचारपूस करण्यासाठी देखील येत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. सॅनिटायझर मागितल्याशिवाय देण्यात येत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या तक्रारी सांगायच्या असतील तर रुग्णालयातील कर्मचारी फोन उचलत नाहीत, असेही या रुग्णांनी सांगितले.

सर्वात भयंकर म्हणजे कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खर्रा किंवा दारू हवी असेल तर त्यांना काही कर्मचारी केवळ 50 रुपयात खर्रा आणि 300 रुपयांमध्ये दारू आणून देतात. रुग्ण मागतील तेव्हा त्यांना सॅनी टायझर दिले जाते अन्यथा दिले जात नाही. तसेच पॉझिटीव्ह रुग्णांना त्यांचा अहवाल दिला जात नाही. कर्मचारी नीट वागत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत असून रुग्णसंख्या 568 झाली आहे. तसेच 349 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 211 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी आयसोलेशन वॉर्डात एका रुग्णाने आत्महत्या केली होती. या रुग्णाने रुग्णालयातील अव्यवस्थेविषयी माजी आमदार चरण वाघमारे यांना सांगितले होते. त्यामुळे त्या बाधिताच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकाराबद्दल ईटीव्ही भारतने जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांच्याशी संपर्क साधला. खंडाते यांनी रुग्णांकडून लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच रुग्णांना पौष्टिक अन्न देण्यात येत असल्याचे सांगितले. जर कधी जेवण चांगले मिळाले, नसेल तर या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे खंडाते यांनी सांगितले.

Last Updated : Aug 18, 2020, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details