भंडारा- जिल्ह्यात पहिल्यांदाच वैनगंगा पतंग महोत्सवाचे आयोजन केले गेले. मकरसंक्रांतीच्या दिवशी शहराच्या बाहेर असलेल्या बैल बाजाराच्या जागेवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, या महोत्सवात न्यायालयाने बंदी घातलेल्या मांजाचा उपयोग करता येणार नाही, असे आयोजकांकडून पहिल्यांदाच सांगितले गेले असल्याने साध्या मांजाच्या माध्यमातून स्पर्धकांनी भाग घेतला.
खरतर जिल्ह्यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच पतंग उडवण्याचा छंद जोपासला जात आहे. मात्र, हा छंद मकरसंक्रांतीच्या काळात नाही तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जोपासला जायचा. मात्र, कालांतराने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी, लहान मुलांनी पतंग उडविण्याचा छंद बंद करून स्वतःला घरात टीव्ही, मोबाईल समोर कोंडून घेतले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करीत पतंग उडविली जाते. मात्र, जिल्ह्यातील हरवलेल्या पतंग छंदाची पुन्हा तरुणांना, लहान मुलांना आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजकांनी पहिल्यांदाच जिल्ह्यात वैनगंगा पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते.