भंडारा - शेतमालाला योग्य दर मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते. ही बाब लक्षात ठेवून जिल्ह्यातील एका शेतकरी प्रोड्युसर कंपनीने काही शेतकऱ्यांना एकत्रित करून पहिल्यांदाच 'केसर' या तांदळाचे पॅकेजिंग करून संपूर्ण राज्यात विक्रीची योजना राबविली आहे. यासाठी महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून मार्केटिंग आणि विक्री केली जाणार आहे.
बांधावरचा 'केसर' तांदूळ आता थेट ग्राहकांपर्यंत, शेतकरी ठरवणार दर 'आसगांवकर अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी'ने 52 शेतकऱ्यांकडून 'केसर' या धानाची बांधावरूनच खरेदी केली. या सर्व व्यवहारांमध्ये कुठलाही मध्यस्थ, दलाल किंवा इतर छुपा खर्च न घेता शेतकऱ्यांकडून संवर्धनाची मोजणी करून त्यांच्या खात्यावर पैसे वळते करण्यात आले. त्याच्या पॅकिंगवर 'केसर' तांदळात असलेले पौष्टिक तत्व, प्रोटीन, कार्बोहायड्रेटबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली,असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मृत कोंबाड्या फेकल्या नाल्यात, दूषित झालेल्या पाण्यामुळे विदेशी पक्षांचाही मृत्यू
जिल्ह्यातील तांदळाला राज्यभरात मोठी मागणी आहे. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून त्याची विक्री केली जात असल्याने ग्राहकांच्या फसवणुकीसह शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा हा तांदूळ ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विविध ठिकाणी मार्केटिंग केले जात आहे. या तांदळाचा दर शेतकरी निश्चित करतील, त्यांना योग्य नफा दिला जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
हेही वाचा -गावागावातील जातीच्या वाड्यांची हिंसक व्यवस्था बदलावी लागेल - नागराज मंजुळे
पुढच्या वर्षी दीड हजार एकरमध्ये या 'केसर' तांदळाची लागवड केली जाणार आहे. तर १०० एकरावर इतर तांदळाची लागवड केली जाणार आहे. हे सर्व तांदूळ पॅकिंग करून विकले जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे शेतमालाला अपेक्षित दर मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी दिली.