नागपुर -सामूहिक बलात्कार पिडीतेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये, अशा सूचना रुग्णालय प्रशासन, पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या, असा आरोप शिवसेना नेत्या तथा प्रवक्ता मनीषा कायंदे ( Manisha Kayande ) यांनी केला आहे. भंडारा गोंदिया येथील सामूहिक बलात्कार पीडितेला भेटण्यासाठी नागपूरात आल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत ही शिवसेनेकडून दिली जाणार होती पण ती सुद्धा घेऊ नये अशा सूचना दिल्याचा आरोप त्यांनी केला.
पीडितेला मदत करू दिली नाही -यात बलात्काराच्या पीडित महिलेला भेटण्यासाठी नागपूरच्या शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील वार्डात पोहचलो. पण त्या ठिकाणी पोलिसांनी एकावेळी एकच व्यक्ती जाईल अशी अट घातली. तसेच कुटुंबियांना विचारपूस केल्यास कुठलिही माहिती त्याना देऊ नयेत अशा सूचना दिल्या होत्या अशी शंका कायंदे यांनी उपस्थित केलीत. त्यांनी अखेर एकावेळी एकच जण वार्डात जाऊन मनीषा कायंदे यांनी पिडीतेसह तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेने तर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचा होता. ती सुद्धा आम्हाला पिडीतेच्या कुटुंबियांना देऊ दिली नाही. त्यानंतर मनीषा कायंदे यांनी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांचीही त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत तपासा संदर्भात माहिती घेतली.
तपासात दिरंगाई -भंडारा जिल्ह्यात सहा दिवस पोलीस अधीक्षक नव्हते. आधीचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना शिंदे गटाचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर ( MLA Narendra Bhondekar ) यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी तिथून हटवले होते. नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक होण्याच्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली. कदाचित पोलीस अधीक्षक राहिले असते तर, ही घटना अशा वळणावर गेली नसती, घटनेच्या तपासात दिरंगाई झाली नसती असेही आमदार तथा शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणल्यात.