भंडारा-महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सामान्य रुग्णालय, भंडाराच्या रक्तपेढी विभागातर्फे आयोजित या शिबिरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमातून आय.एम.ए.ने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. संचारबंदीमुळे नागरिक घराबाहेर निघत नसल्याने रक्तदात्यांची संख्या कमी झाली. रक्तपेढीतील रक्ताचा साठा कमी झाल्याने इतर आजारातील रुग्णांना रक्ताची कमतरता भासण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर काही ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित केली गेली. मात्र, त्याची संख्या कमी असल्याने आवश्यकतेनुसार रक्त पुरवठा होत नव्हता.