भंडारा- जिल्ह्यात आलेल्या पुरात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. भंडारा-वरठी रस्त्यावरील गणेश नगरी जवळ मेहंदी पुलाला लागून असलेल्या एका घरात या पती-पत्नीचा मृतदेह आढळला. या भागात तीन दिवसांपासून पुराचे पाणी होते. आज पाणी ओसरल्यानंतर ही घटना पुढे आली.
रूपचंद सदाशिव कांबळे (वय ५५) व रत्नमाला रूपचंद कांबळे (वय ४५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. शनिवारी आलेल्या पुरात गणेश नगरी हा भाग पूर्णत: पाण्यात बुडाला होता. जवळपास दहा किलोमीटर अंतरावर पाच ते सहा फूट पाणी साचलेले होते. कांबळे दाम्पत्य ज्या घरात राहत होते, तो भाग पुनर्वसनामध्ये गेलेला होता. मात्र, ते घर शासनातर्फे पाडण्यात आले नव्हते. त्यामुळे, कांबळे दाम्पत्यांनी आपला संसार या घरात थाटला. बरेचदा त्यांना इथून बाहेर काढण्यात आले, मात्र दरवेळेस ते पुन्हा त्या घरी येऊन राहायचे. पावसाळ्यामध्ये या घरा सभोवताल असलेल्या खोलगट भागांमध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे हा परिसर अतिशय धोकादायक होता.