महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष: भंडारा जिल्ह्यात पैश्यांसाठी, खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेपोटी वन्य प्राण्यांची शिकार - न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प

वनसंपदाने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात एकूण 1347.77 स्क्वेअर किलोमीटर एवढा वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये वाघ, बिबट,अस्वल यासारखे वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांची भंडाऱ्यामध्ये पैशांसाठी, शेतीचे पीक वाचविण्यासाठी, मास खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेसाठी शिकार केली जात आहे.

hunting-of-wildlife-in-bhandara-district-for-money-food-and-superstition
भंडारा जिल्ह्यात पैश्यांसाठी, खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेपोटी वन्य प्राण्यांची शिकार

By

Published : Feb 25, 2021, 5:54 PM IST

भंडारा - वनसंपदाने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात एकूण 1347.77 स्क्वेअर किलोमीटर एवढा वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये वाघ, बिबट,अस्वल यासारखे वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांची भंडाऱ्यामध्ये पैशांसाठी, शेतीचे पीक वाचविण्यासाठी, मास खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेसाठी शिकार केली जात आहे. मागील सात-आठ वर्षामध्ये जवळपास अठरा वाघांची शिकार झाली आहे. यासह इतरही वन्यप्राण्यांची इथे शिकार केली जाते. व्याघ्र संरक्षण अधिकाऱ्यांच्या मते शिकार होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र वन्यप्रेमींच्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये लहान प्राणांपासून तर मोठ्या प्राण्यांची शिकार केली जाते. विशेषता संरक्षित नसलेल्या वन क्षेत्रात ही शिकार केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यात पैश्यांसाठी, खाण्यासाठी आणि अंधश्रद्धेपोटी वन्य प्राण्यांची शिकार
भंडारा जिल्ह्यात कोका वन्यजीव अभयारण्य, उमरेड करहांडला व्याघ्र प्रकल्प तसेच न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक वनविभाग यांचे क्षेत्र आहे. यामध्ये 820 स्क्वेअर किलोमीटर एवढा परिसर हा राखीव वनक्षेत्र म्हणून आहे. तर 277 स्क्वेअर किलोमीटर एवढा संवर्धन वनक्षेत्र आहे. 240 स्क्वेअर किलोमीटर एवढा प्रादेशिक वन क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये वाघ, बिबट, अस्वल, हरीण, सांबार रान डुक्कर, रानगवे, रानकुत्रे, खवल्या मांजर, घोरपड विविध प्रजातीचे सरपटणारे प्राणी आणि विविध प्रजातीचे पक्षी यामध्ये विदेशी पक्षी यांचा समावेश आहे.
आठवड्याभरापूर्वी दोन बिबट्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला-
15 फेब्रुवारीला अड्याळ वनपरिक्षेत्रामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात दोन नर बिबटे मृतावस्थेत आढळले. यापैकी एका नराचे वय जवळपास आठ वर्षे आणि दुसरा नर हा जवळपास तीन ते चार वर्षाचा होता. सुरुवातीला हा एक अपघात म्हणून त्याची नोंद केली गेली असली तरी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या मते या बिबट्यांना विष देऊन त्यांची हत्या करण्यात आली. नंतर हा देखावा करण्यासाठी त्यांना विहिरीत फेकून देण्यात आले, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. वनविभाग त्यानुसार संशयित लोकांची चौकशी करीत आहे.
भारतातला सर्वात मोठा वाघ हा भंडारा जिल्ह्याचा-


भारतातील सर्वात मोठा वाघ 'जय' हा भंडारा जिल्ह्यात होता. मागच्या पाच वर्षापासून हा 'जय' अचानक बेपत्ता झाला आहे. शासकीय दस्तावेज अनुसार त्यांनी त्याचा क्षेत्र बदललेला असला तरी तो कोणत्या क्षेत्रात आहे. याची कुठेही नोंद नाही. वन्यजीव प्रेमीच्या नुसार या वाघाची शिकार करण्यात आली आहे. मात्र त्याविषयी शासन आणि वन विभाग सत्यता लपवत आहे.


आतापर्यंत 18 वाघांची शिकार-

मागील सात ते आठ वर्षात जय प्रमाणेच भंडारा जिल्ह्यातील अठरा वाघांची शिकार झाली आहे. यामध्ये जय चे आजोबा राष्ट्रपती त्याचे वडील डेंडू त्याची आई ये मार्क, जय त्याचा परीवार चंडी, श्रीनिवास, बिट्टू, चार्जर, टी सिक्स, जयचंद असे एकूण 18 वाघांची शिकार झालेली आहे. यामधील काही वाघांची शिकार पुढे आली तर उर्वरित सर्व वाघ हे कुठे आहेत याचा ठोस पुरावा वन विभाग देऊ शकत नाही. कारण त्यांचीही शिकार केली गेली आहे, असे मत वन्यजीव प्रेमी यांनी व्यक्त केला आहे.

अंधश्रद्धेसाठी केली जाते शिकार-

भंडारा उपवन संरक्षण यांना याविषयी विचारले असता मागील तीन वर्षांमध्ये भंडारा जिल्ह्यात केवळ रानडुकरांची शिकार केली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. तर कोका वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्यांना विचारले असता रानडुक्कर, हरिण आणि खवल्या मांजर या तीन प्राण्यांची शिकार कोका अभयारण्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या व्यतिरिक्त शिकारीचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. तर उमरेड करहांडला व्याघ्र प्रकल्पात 2019 मध्ये पवनी क्षेत्रात दोन वाघांची विष देऊन हत्या करण्यात आली होती. वन विभागाचा माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात वन्य जीवांची शिकार होत नसली तरी वन्यप्रेमी यांच्या मते भंडारा जिल्ह्यात वाघांसह अस्वल, रानडुकर, हरिण, चितळ, सांबर, खवल्या मांजर, घोरपड, विदेशी पक्षी या सर्वांची शिकार केली जाते. ही शिकार पैसे कमविण्यासाठी मास खाण्यासाठी, शेतातील पीक वाचविण्यासाठी तसेच अंधश्रद्धेपोटी होते. अंधश्रद्धेपोटी भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. कुख्यात तस्कर कुट्टू पारधी याला भंडारा जिल्ह्यात वाघाच्या शिकारी प्रकरणी अटक केली आहे.

फासे पारधी आणि स्थानिक लोकांचा समावेश-

मध्यप्रदेशच्या फासेपारधी समाजाचे लोक बहुतांश वाघाची शिकार करतात. यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेतात. तर अस्वल, रानडुक्कर, बिबट्या, हरीण सारख्या प्राण्यांची शिकार स्थानिक लोकच करतात. विशेषता संरक्षित वनक्षेत्राच्या व्यतिरीक्त प्रादेशिक वन क्षेत्रामध्ये या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे शासनाने संरक्षित वनक्षेत्राप्रमाणेच असंरक्षित असलेल्या वनक्षेत्र कडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव प्राण्यांची हत्या करणारे थांबविणे आता गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने अजून कठोर पावले उचलण्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-नीरव मोदीला झटका, भारतात लवकरच प्रत्यार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details