भंडारा- येथे वाळू तस्करीसाठी बनविण्यात आलेली पोलीस चौकी जाळल्यानंतर महसूल विभाग जागे झाले आहे. भंडारा तालुका महसूल विभागाने भंडारा शहरालगतच्या ग्राम बेला येथे अवैधपणे साठवलेल्या शेकडो ब्रास वाळूसाठा जप्त करत भंडारा तहसील कार्यालयात जमा केला. यामुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले आहेत. जप्त केलेला वाळूसाठा सुमारे दीडशे ब्रास असल्याची माहिती आहे.
बेला गावात लपवली होती वाळू
भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने वाळू माफियांची नजर नेहमी येथील वाळूवर असते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती माफिया सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. त्यातूनच अवैधरित्या रेतीची साठवणूक करून ती जास्त दरामध्ये विक्री करण्याचा गोरखधंदा येथील रेती तस्करांनी चालविला आहे. भंडारा शहरालगत असलेल्या ग्राम बेला येथील रिकाम्या जागेवर काही रेती तस्करांनी शेकडो ब्रास अवैधरित्या रेतीची साठवणूक केली होती. याची माहिती होताच भंडारा तहसील महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत हा रितीसाठा जप्त केला.
जवळपास 5 ते 6 लाख रुपयांची वाळू जप्त
बेला गावात जप्त केलेली वाळू अंदाजे 140 ते 150 ब्रास असून याची अंदाजे किंमत ही 5 ते 6 लाख रुपयांची असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. जप्त केलेली वाळू सध्या तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आली असल्याने तहसील कार्यालयाला वाळू घाटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही जप्त केलेली वाळू ही घरकुल लाभार्थ्यां त्यांच्या गरजेनुसार देणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.
पोलीस चौकी जाळल्यानंतर ही कारवाई केवळ देखावा नसावा
बेलगाव येथे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत होती. ती थांबविण्यासाठी बेलगाव येथे पोलिस चौकी उभारण्यात आली होती. तीन दिवसा पहिले ही पोलीस चौकी जाळली गेली होती. हे प्रकरण जिल्ह्यत गाजले होते. त्यांनतर ही महसूल विभागाची पहिली मोठी कार्यवाही आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वाळूचा अवैध साठा करून ठेवण्यात आला आहे. मात्र, एकाच ठिकाणी आणि तीही आताच का असा प्रश्न निर्माण होत आहे. ही कार्यवाही म्हणजे निव्वळ देखावा ठरू नये अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जाते.
हेही वाचा -विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न
हेही वाचा -'आई मला माफ कर, तुझी लाडकी...' पत्र लिहून क्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या