भंडारा - जिल्ह्यातील सर्वच महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविक पूजेसाठी दाखल झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात प्रतापगड, गायमुख, आंबोरा, जिरी अशा विविध ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी जत्रा भरते, यासाठी राज्य परिवहन विभागाकडून 212 अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत.
भंडाऱ्यात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी - morning
देवाधिदेव महादेवाच्या महाशिवरात्री दिवशी भाविक भक्तिमय झाले आहेत. भंडारा शहरातील प्रसिद्ध बहिरंगेश्वर मंदिरात सकाळी साडेआठ वाजल्यापासून आरतीला सुरुवात झाली.
देवाधिदेव महादेवाच्या महाशिवरात्री दिवशी भाविक भक्तिमय झाले आहेत. भंडारा शहरातील प्रसिद्ध बहिरंगेश्वर मंदिरात सकाळी साडेआठ वाजल्यापासून आरतीला सुरुवात झाली. महादेवाचे भक्त सकाळीच बेल-फूल-हार घेऊन महादेवाला अर्पण करण्यासाठी पोहोचले. देवाचे नामस्मरण आरती आणि श्लोक यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. देवाधी देव म्हणून महादेव ओळखले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक 'बोला हर हर महादेव', च्या घोषणदेत महादेवाची पूजा करतात.
या मंदिराच्या परिसरात आजपासून कुंभार लोकही नवीन मातीची भांडी विक्रीसाठी इथे आणतात. दिवसभर गर्दी वाढत जाणार आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. जिल्ह्यात गायमुख, प्रतापगड, आंभोरा, जिरी या विविध ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या जत्रा भरतात. विदर्भाच्या विविध शहरातून, मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. यावर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे या सर्वच जत्रेच्या ठिकाणी राजकीय लोकही मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहेत.
भाविकांना या सर्व ठिकाणी सहजतेने पोहोचता यावे, यासाठी भंडारा, गोंदियासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन अतिरिक्त 212 बस सोडणार असल्याचे सांगितले. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास 65 हजार प्रवासी या यात्रेत सहभागी झाले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भंडाऱ्यातून राज्य परिवहन महामंडळाला 20 लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.