भंडारा -भंडारा मार्गे नागपूरला जाणाऱ्या ट्रकला अडवून, त्यामध्ये असलेला एक क्विंटल 48 किलोचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. या गांजाची किंमत 14 लाख 85 हजार रुपये एवढी असून, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ओडीसावरून गांजा घेऊन भंडारा मार्गे एक ट्रक नागपूरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नाकेबंदी केली. कारधा चौकातील नाकेबंदीदरम्यान ट्रक क्रं. एन एल 08/ एल 4861 या ट्रकचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल एक क्विंटल 48 किलो गांजा आढळून आला आहे.
15 लाखांचा गांजा जप्त, तीन जणांना अटक धानाच्या भुशाच्या पोत्यामागे गांजाची पोती
ट्रकची तपासणी करत असताना सुरुवातीला पोलिसांना धानाच्या भुशाची पोती आढळून आली, मात्र ट्रकमधून गांजाचा वास येत असल्याने पोलिसांनी ही धानाची सर्व पोती खाली उतरवली. ही पोती खाली उतरवल्यानंतर त्यामागे गांजाची पोती लपवून ठेवल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी या ट्रकमधून 11 गांजाची पोती जप्त केली असून, यामध्ये 1 क्विंटल 48 किलो गांजा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तीन आरोपींना अटक
या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, प्रीतसिंग बलवीरसिंग अरोरा ( 29 वर्ष), समिश संजीव मेश्राम (18 वर्ष) व ट्रक चालक प्रवीण नामदेव राऊत 31 वर्ष सर्व राहणार नागपूर या तिघांविरुद्ध कारधा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गांजासह ट्रक, धानाचा भुसा, 3 मोबाईल असा एकूण 30 लाख 45 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.