भंडारा :जिल्ह्यात काल(गुरुवार) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने हाहाकार निर्माण केला आहे. जिल्ह्याच्या सातही तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. एकाच रात्रीत या पावसामुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी 86 टक्क्यावरून 102 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, साकोली तालुक्यातील बोधरा तलाव फुटल्याने गावात पाणी शिरले आहे. तसेच गोसे धरणाचे 33 ही दार उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून भंडारा तालुक्यात 175 मिलीमीटर, मोहाडी तालुक्यात 180 मामी, तुमसर तालुक्यात 153 मीमी, पवनी तालुक्यात 77 मिमी, साकोली तालुक्यात 254 मिमी, लाखांदूर तालुक्यात 99 मिमी आणि लाखनी तालुक्यात 201 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण 163 टक्के सरासरी पाऊस कालपासून बरसलेला आहे. या पावसामुळे साकोली तालुक्यातील बोधरा तलाव फुटला असून गावांमध्ये पाणी शिरले आहे. सुदैवाने जीवितहनी झालेली नाही. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा या गावातील तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे गावात पाणी शिरले आहे. तसेच बऱ्याच लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे.