भंडारा - प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी गाडीचा मंगळवारी झालेल्या अपघातात 5 विद्यार्थिनींसह एका महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध प्रवासी गाड्या बंद करण्याची मागणी होत आहे. या अगोदरही एका काळी पिवळी प्रवासी गाडीच्या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2 महिने या गाड्या बंद राहिल्या. आता पुन्हा या गाड्या बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, अपघात थांबविण्यासाठी या गाड्या बंद करणे या एकमेव पर्याय आहे, का असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.
साकोली तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी ही प्रवासी गाडी खाली कोसळली होती. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. या गाडीमध्ये एकूण पंधरा लोक प्रवास करीत होते. अशा गाड्यांची क्षमता ही सात अधिक एक एवढी असते. मात्र, प्रत्येक वेळी या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने वाजवीपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसल्यामुळे बरेचदा चालक हा त्याच्या जागेवर न बसता गाडीच्या दाराजवळ खेटून बसतो. त्यामुळे अडचणीच्या वेळेस या चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने मोठे मोठे अपघात होत असतात.