भंडारा - कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता भंडारा जिल्ह्यत आरटीपीसीआर चाचण्याची लॅब सुरू केली गेली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सध्या भंडाऱ्यामध्ये ही लॅब नसल्याने या ठिकाणी कोरोना चाचणी केल्यावर चार दिवसांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. त्यामुळे रुग्णांवर उपचार सुरू करण्यात उशीर होत आहे. त्यामुळे ही TRUENAT लॅब आजच सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातच सुरू होणार आरटीपीसीआर चाचणी, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण भंडारा जिल्ह्यात आतपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२११ इतकी झाली असून या ठिकाणी ९० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अजूनही आरटीपीसीआर चाचणी केल्यावर तपासणीकरता गोंदिया जिल्ह्यात किंवा नागपूरला तपासणीकरता पाठवावी लागत असल्याने चार दिवस अहवाल मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांवर वेळेवर उपचार सुरू होत नाही. या अडचणीची तक्रार स्थानिक लोकांनी खासदार प्रफुल पटेल आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.जिल्ह्यतील आरोगविषयी आढावा घेण्यासाठी गुरुवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आढावा घेतला. यावेळी आठ दिवसात सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेमडेसीविर ही लस उपलब्ध असल्याचे सांगितले असून जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढत असलेली संख्या पाहता तालुका लेव्हलवर देखील बेडची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. जिल्ह्यात स्वतःची लॅब नसल्याने जो त्रास नागरिकांना होत आहे. याविषयीआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खंत व्यक्त केली. तात्पुरत्या स्वरूपात आज TRUENAT लॅबचे लोकार्पण आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले असून दर दिवशी ५० लोकांचे आरटीपीसीआर टेस्ट या लॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. भविष्यात यापेक्षा मोठी मशीन आणून त्याद्वारे 500 ते 1000 लोकांची टेस्ट एका दिवसात केली जाणार आहे. येत्या आठ दिवसात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब उभारून चाचणी सुरू करणार असलायची ग्वाही आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली. तसेच डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, टेक्निशियन यांची आवश्यकतेनुसार भरती करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.