भंडारा - सलून दुकानावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना पैसे नसल्याचे सांगत, स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून दुकानदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेव्हा धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांसमोर कारवाई करावी तरी कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी अधिकाऱ्यांनी सलून दुकानदाराविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेनंतर सलून दुकानदारांनी पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र बंदीचे आदेश असतानाही भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात प्रमोद केसरकर याचे 'झिडोस' नावे असलेले सलून बुधवारी सुरू होते. याची माहिती नगरपालिका अधिकाऱ्यांनी मिळाली. तेव्हा ते पोलीस कर्मचाऱ्यांसह दुकानात पोहोचले. त्या वेळेस दुकानात ग्राहकांची बरीच गर्दी होती.
अधिकाऱ्यांनी, दुकान बंद ठेवण्याचे आदेश असताना दुकान कसे उघडे ठेवले, याबाबत विचारणा केली. तसेच त्यांनी या प्रकरणी दुकानदार प्रमोद केसलकर याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तेव्हा प्रमोदने जवळ उभ्या असलेल्या त्याच्या गाडीतून पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि ती स्वत:च्या अंगावर ओतून घेतली. त्याने माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगत मी आत्महत्या करतो, असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्याला रोखले. या प्रकरणामुळे नगरपालिकेचे कर्मचारी चांगलेच धास्तावले. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.