भंडारा- जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या महापुरामुळे शासकीय गोदामातील 6 हजार क्विंटल धान्य हे खराब झाले आहे. या धान्याची दुर्गंधी पसरलेली आहे. महापुराच्या पाण्याने ओले झालेल्या धान्याचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून शासनाचा प्रस्ताव आल्यानंतर या धान्याची विल्हेवाट कशी लावायची, हे ठरवले जाणार आहे.
ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या तीन दिवसात आलेल्या महापुरात भंडारा शहराच्या बऱ्याच भागात वैनगंगेचे पाणी शिरले होता. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. महापुराचे पाणी शासकीय गोदामातही शिरले होते. तीन गोदामापैकी दोन गोदामात जवळपास 7 ते 8 फूट पाणी शिरले होते. अचानक पूर आल्यामुळे धान्य गोदामातून बाहेर काढणे शक्य झाले नाही. पुराचे पाणी ओसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी या गोदामाची पाहणी केली असता दोन गोदामात 7 ते 8 फुटापर्यंत पाणी शिरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे येथे असलेला गहू, तांदूळ, साखर, चणाडाळ, तूर डाळ आणि चना हे सर्व जवळपास तीन दिवस पाण्यात राहिल्याने खराब झाले होते. या गोदामामध्ये 17 हजार क्विंटल धान्य साठवून ठेवले होते त्यात तांदूळ 9 हजार 442 क्विंटल, गहू 6 हजार 215 क्विंटल, तूरडाळ 700 क्विंटल, चना डाळ 545 क्विंटल, चना 6. 32 क्विंटल आणि साखर 144 क्विंटल साठवून ठेवली होती.
वैनगंगेच्या पुराचे पाणी गोदामात पाणी भरल्याने बऱ्याच प्रमाणातील धान्य पूर्ण भिजले होते. यामध्ये तांदूळ 3826 क्विंटल, गहू 1833 क्विंटल, तुरदाळ 266 क्विंटल, चणाडाळ 188 क्विंटल तर चना आणि साखर पूर्ण म्हणजे चना 6. 32 क्विंटल आणि साखर 144 क्विंटल भिजले असे एकूण 6263 क्विंटल धान्य या पाण्यात पूर्णपणे ओले झाले आहे.