महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यालयांकडे पाठ; कार्यालये दिसतात रिकामी

भंडारा जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयांना पाठ दाखवण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. नव्याने आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घर भत्ते कापून घेतले तरीही या अधिकाऱ्यांच्या वागण्यात काही बदल झाला नाही.

रिकामे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
रिकामे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय

By

Published : Jan 29, 2020, 10:15 AM IST

भंडारा - शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात वेळेत हजर रहावे, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, या आदेशाला भंडारा जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मंगळवारी रिकामे दिसले. विभागीय स्तरावर मिटींग असल्याने हे कर्मचारी नागपूरला गेले असल्याचे, उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले.


नागपूर येथे मिटींग असल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी आणि इतर तीन कर्मचारी सोमवारीच नागपूरला गेले असे सांगण्यात आले. वास्तविक पाहता हे तिन्ही कर्मचारी नागपूरवरूनच ये-जा करतात. त्यामुळे त्यांनी हजेरी पटावर सही करण्यासाठी कार्यालयात येण्याची तसदीही घेतली नाही.

भंडाऱ्यातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यालयांकडे पाठ

हेही वाचा - "मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट

ही परिस्थिती फक्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचीच नाही, तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांची आहे. भंडाऱ्यावरून नागपूरचे अंतर 70 किलोमीटर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विभागाचे विभाग प्रमुख नागपूरवरून दररोज ये-जा करतात. ते कधी वेळेवर कार्यालयात हजर राहत नाहीत. या गोष्टीचा फायदा कार्यालयांतील इतर कर्मचारीही घेतात आणि गैरहजर राहतात.

अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या एका कामासाठी अनेक चकरा माराव्या लागतात. अधिकारी आणि कर्मचारी मीटिंग आणि दौऱ्यांची कारणे दाखवून अनेकदा नागपूरला थांबतात आणि त्यांची खासगी कामे आटोपतात. नव्याने आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घर भत्ते कापून घेतले तरीही या अधिकाऱ्यांच्या वागण्यात काही बदल झाला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details