भंडारा - महाविकास आघाडीच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भंडारा येथे नवीन शासकीय वेळ ज्या कर्मचाऱ्यांना पाळता येत नाही अशा 25 लेट लतीफ कर्मचाऱ्यांची गैरहजेरी लावण्यात आली. हे सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे 9 वाजून 40 मिनिटांनी स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे हे जिल्हा परिषदेच्या प्रमुख प्रवेशद्वारा समोर हजर होते. यावेळी त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
सोमवारपासून पाच दिवसांचा शासकीय कार्यालयीन आठवडा सुरू झालेला आहे. सोमवारपासूनच कार्यालयीन वेळ ही सकाळी 9 वाजून 45 मिनिटांची झालेली आहे. ही वेळ गाठण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी प्रवेश दारासमोर उभे होते. त्यांनी उशिरा येणाऱ्या लोकांची नोंद घेतली. तर स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवेशद्वारासमोर उभे असलेले पाहून शासकीय कर्मचाऱ्यांची एकच पळापळ सुरू झाली. बरीच लोक अगदी शेवटच्या मिनिटांवर आले. त्यांनी धाव घेत हजेरी रजिस्टर गाठले.