भंडारा - शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये गोसे प्रकल्पग्रस्तांनी गोंधळ घातला. आधी पूनर्वसन, नंतर धरण असे नारे लावत सरकारचा निषेध केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सभास्थळाच्या बाहेर नेले.
भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसे प्रकल्पग्रस्तांचा गोंधळ; पुनर्वसन करण्याची मागणी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्त भंडाऱ्यात आले आहेत. गेल्या वर्षी ५० हजार हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली होती. यावर्षी १ लाख हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी अचानक निषेधाचे नारे ऐकायला आले. २ तरुणांनी हातात बॅनर घेऊन मुख्यमंत्र्याचा निषेध केला. तसेच प्रकल्पबाधीत लोकांच्या मागण्या मांडण्यात आल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून गोसे प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही. ३६५ कोटी रुपयांचा प्रकल्प आता १९ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत, असे आरोप यावेळी करण्यात आले. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सभास्थळाच्या बाहेर काढले.
युती सरकारच्या काळात गोसे प्रकल्पाला उशिर झालेला नाही. मात्र, आता या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करू तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या देखील पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच सभेमध्ये असे गोंधळ करणाऱ्यांची सवय झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.