भंडारा - तुमसर तालुक्यातील साखळी गावातील रस्त्यावर ट्रक आणि दुचाकी अपघातात ट्रक खाली येऊन एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमध्ये तरुणीच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. खुशबू रतनलाल पारधी (23 रा. चिचोली) असे मृत तरुणीचे नाव आहे.
खुशबू ही तुमसर येथून तिच्या दुचाकीने (एम.एच. 49 ए 8355) विदेश्वरी भारत ठाकूर (28) आणि तिची वहिनी रेखा पारधी यांच्यासह चिचोली गावाला परत जात होती. साखळी गावाजवळ पोहोचताच अचानक एक म्हैस समोर आल्याने खुशबूचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रक (क्रमांक सी.बी. 04 एल. एम. 5817) चाकाखाली ती गेली. ट्रक चालकाने तिला विचावण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आणि खुशबू दोघेही फसले. त्यामुळे काही मीटर अंतरावर फरफटत गेल्याने खुशबूच्या डोक्याला जबर दुखापत झाली. याच तिचा जागीच मृत्यू झाला. तर, विद्वेश्वरी ठाकूर आणि रेखा पारधी या दोघी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तुमसर रुग्णालयात भरती करण्यात आले.