भंडारा - केवळ अडीच तोडे सोन्याच्या लालसेपोटी तीन मित्रांनी मिळून एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. एक डिसेंबर रोजी कोका जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. केवळ 24 तासांच्या आत कारधा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना अटक केली. दयाराम पुंडलिक टिचकुले (50) असे मृत व्यक्तीचे नाव असून योगेश तितीरमारे (30), संजय काटेखाये (28) आणि नरेंद्र पुडके (42) सर्व राहणार रेंगेपार, ता. लाखणी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
26 तारखेला झाली होती हत्या -
भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कोका जंगलातील नवेगावच्या शिवारात एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मात्र, मृतदेहाच्या चेहऱ्यावरील अर्धा भाग हा अगदी विद्रूप करून ठेवला असल्याने मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना कठीण जात होते. त्याच्या अंगावरील कपड्यांमुळे मृतदेहाची ओळख पटली. मृतकाचा हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होता, अशी माहिती समोर आली आहे.