भंडारा -जिल्ह्यातील अड्याळ पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 20 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रेतीघाट बंद असतानाही अवैध मार्गांनी वाळूची वाहतूक
सध्या जिल्ह्यातील सर्वच रेतीघाट बंद आहेत. असे असताना देखील अवैध वाळूची वाहतूक सातत्याने सुरूच आहे. रेतीघाट बंद असल्याने या वाळूचा दर देखील वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या वाळू माफियांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. चोरट्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून वाळू तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे आणि वाळूमाफियांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप देखील नागरिकांमधून होत आहे.
अड्याळ पोलिसांची कारवाई
दरम्यान अड्याळ पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना, त्यांना पालोरा- कोंढा-किटाळी फाट्यावर नंबर प्लेट नसलेल्या चार ट्रॅ्क्टरमधून वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या ट्रॅक्टरची चौकशी केली. या चौकशीमधून अवैध पद्धतीने वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.