भंडारा- जिल्ह्यात मागील 24 तासात 4 रुग्ण सापडले असून पहिल्यांदा एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ही माहिती पुढे येताच पोलीस विभागामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चार पैकी एक रुग्ण हा पवनी तालुक्यातील असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. मात्र, सायंकाळी तो रुग्ण पवनी चा नसून भंडारा शहरातील आहे, अशी माहिती देण्यात आली. एवढी मोठी चूक कशी आणि कोणाकडून झाली हे मात्र समजू शकले नाही.
भंडारा जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरत आहे 24 तासात चार नवीन रुग्ण आढळले असून यापैकी 2 भंडारा शहरातील, 1 लाखांदूर तालुक्यातील आणि एक साकोली तालुक्यातील आहे.भंडारा शहरातील एक रुग्ण हा 31 वर्षीय पोलीस कर्मचारी असून तो सध्या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेक पोस्टमध्ये आपले कर्तव्य बजावत होता. यादरम्यान बाहेरून आलेल्या बऱ्याच लोकांचे तपासणी करतांना अप्रत्यक्षपणे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला कोरोना झाला असावा, अशी माहिती पुढे येत आहे.तिथे कार्यरत इतर पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन केल्यानंतर सर्वांचे घश्यातील स्त्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, बाकी कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र,या कर्मचाऱ्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. भंडारा मधील पोलीस शनिवारपर्यंत या कोरोना पासून मुक्त होते. मात्र, रविवारी एका कर्मचाऱ्याच्या अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यातील इतर कर्मचारी सतर्क झाले त्यांना असून कर्तव्य बजावताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.