भंडारा : भाजपचे माजी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रविवारी दुपारी तीन वाजे पवनी येथील वज्रेश्वर घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. 2014 ते 2019 या कालावधीत ते भंडारा विधान सभा क्षेत्राचे आमदार राहिले आहेत.
मूळचे पवनी तालुक्यातील रहावसी असलेले अवसरे हे व्यवसाय आणि वकील होते. मात्र राजकारणातही त्यांना सुरुवातीपासूनच रुची असल्याने त्यांनी आपले राजकारणाचे काम हे जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली. त्यानंतर अवसरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पवनी येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. पवनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. 2009 मध्ये भंडारा पावणे विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी मागितली. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
भाजप पक्षाशी निष्ठा कायम ठेवली:2014 मध्ये पुन्हा विधानसभेची उमेदवारी त्यांनी मागितली. मात्र शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करीत भरघोस मतांनी विजय मिळविला. 2014 ते 19 या काळात भंडारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या मनमिळावू आणि साध्या स्वभावामुळे ते पाच वर्षात लोकप्रिय आमदार म्हणून नावारूपास आले होते. व्यवसायाने वकील असल्याने अभ्यास आणि कायद्याच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र 2019 मध्ये भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारली. मात्र असे असले तरी त्यांनी भाजपा पक्षाशी निष्ठा कायम ठेवली. आजही ते पक्षाच्या विविध कार्यक्रमात तेवढ्याच उत्साहाने सहभागी होत होते. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या महाजनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर घेतल्या गेलेल्या बैठकीला हजेरी लावली होती.