महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे लोककलाकारांवर उपासमारीची वेळ, शासनाला मदतीची मागणी - Folk artist hunger strike

लॉकडाऊनमुळे लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आमचा विचार करावा आणि आम्हाला येत्या उत्सवांसाठी कला सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या कलाकारांकडून होत आहे. या मागणीसाठी श्रीकांत नागदेवे या लोककलाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Folk artist hunger strike Bhandara
लॉकडाऊमुळे लोककलाकारांवर उपासमारीची वेळ

By

Published : Nov 7, 2020, 7:37 PM IST

भंडारा - मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कलाकार ७ ते ८ महिने काम करून वर्षभर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, यावर्षी काम नसल्याने त्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे, शासनाने आमचा विचार करावा आणि आम्हाला येत्या उत्सवांसाठी कला सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कलाकारांकडून होत आहे. या मागणीसाठी श्रीकांत नागदेवे या लोककलाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

माहिती देताना शाहीर श्रीकांत नागदेवे व शाहीर वैशाली रहांगडाले

नागदेवे यांनी गेल्या १५ वर्षापासून शाहीर म्हणून जनजागृतीची कामे केली आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी आपल्या गायनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे. लोकांना भेडसावणाऱ्या समस्याही त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मांडल्या. मात्र, आज त्यांच्यासमोरच समस्येचे डोगर उभे राहिले आहे. शासन त्यांच्या समस्या सोडवू शकत नसल्याने त्यांनी शेवटी उपोषणाचा हत्यार उपसले आहे. नागदेवे यांनी २ तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला जिल्ह्यातील इतर कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

जवळपास २ हजार कलाकार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

तमाशा, भारूड, गोंधळ, नाटक, दंडार, पोवाडा, यासारख्या कला सादर करणारे लहान मोठे जवळपास २ हजार कलाकार जिल्ह्यात आहेत. गणपती स्थापनेपासून या कलाकारांना विविध ठिकाणी त्यांची कला सादर करण्याचे आमंत्रण मिळते. विशेष करून ग्रामीण भागात मंडईमध्ये या कलाकारांच्या कलांना योग्य तो वाव मिळतो, ती संधी मिळते. मात्र, यावर्षी या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची परवानगी अजून तरी शासनातर्फे मिळाली नसल्याने हे कलाकार सध्या अडचणीत सापडले आहेत.

आज जवळपास सर्वच व्यवसाय, दुकाने सुरू झालेली आहेत. एवढेच काय तर, दारूची दुकानेसुद्धा सुरू झालेली आहेत. मग जगण्याचे एकमेव साधन असलेल्या आमच्या कलेबद्दल शासन गंभीर का नाही. आम्ही जगावे, की मरावे हे शासनाने सांगावे, असा सवाल कलाकार करीत आहेत. शासनाने एकतर आम्हाला आमची कला सादर करण्यासाठी परवानगी द्यावी, किंवा आमचे कुटुंब चालवण्यासाठी आम्हाला ठराविक मानधन द्यावा. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार शासन करणार नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असे उपोषणकर्ते नागदेवे यांनी सांगितले.

हेही वाचा-भंडारा : प्रशासकीय अधिकारी अन् पोलीस पथकासह आमदारांची वाळू साठ्यावर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details