भंडारा- 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार पडला. उत्कृष्ट कामाबद्दल भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांचे यावेळी सत्कार करण्यात आले. या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्र्यांनी जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न केला.
पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते झेंडावंदन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडला कार्यक्रम
दरवर्षी पोलीस मुख्यालयाच्या मैदानात झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठराविक लोकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झेंडावंदनाचे कार्यक्रम सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. झेंडावंदनानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाची घटना दुर्दैवी
ते म्हणाले, 9 जानेवारीला जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी होती. याची संपूर्ण चौकशी सुरू आहे. तसेच भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत, यासाठी ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
राज्याच्या प्रगतीत जिल्ह्याचा मोलाचा वाटा
महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये भंडारा जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. धान उत्पादक जिल्हा तसेच खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा म्हणून भंडाऱ्याची ओळख आहे. या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शक्य तेवढी आर्थिक मदत शासनातर्फे मिळवून या जिल्ह्याचा विकास साधू, असे यावेळी पालकमंत्री कदम म्हणाले.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या सत्कार
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांचा झेंडावंदनानंतर पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले. सैनिक कल्याण साठी सर्वाधिक ध्वज निधी एकत्रित करणाऱ्या करण्याचा मान भंडारा जिल्हाने मिळवला आहे. यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्याची ही जिल्ह्याची पहिलीच वेळ आहे.
वैद्यकीय कर्मचारी व पोलिसांचाही सत्कार
पूर परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचविणाऱ्या पोलिसांचाही सत्कार करण्यात आला आहे. तर कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांचाही सत्कार यादरम्यान करण्यात आला.
पालकमंत्र्यांनी पहिल्यांदाच जनता दरबारचे केले आयोजन
झेंडावंदन झाल्यानंतर पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जनता दरबारचे आयोजन केले होते. या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबद्दल प्रत्यक्ष संवाद साधून नागरिकांचे प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला गेला. या जनता दरबारात नागरिकांनी त्यांच्या समस्यांचा पाढा पालकमंत्री पुढे वाचला आणि पालकमंत्र्यांनी ही संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संवाद साधून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले.
हेही वाचा -भंडारा रुग्णालय जळीतकांड: ४ जण निलंबित, एक बडतर्फ